Monday, February 2, 2015

avadto maj afat sagar / आवडतो मज अफ़ाट सागर,

आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

-------कुसुमाग्रज

he rashtra devatanche lyrics /हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे

-------ग. दि. माडगूळकर

tujhya gala majhya gala lyrics / तुझ्या गळा, माझ्या गळा

तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा 
ताई, आणखी कोणाला ?
चल रे दादा चहाटळा !

तुज कंठी, मज अंगठी !
आणखी गोफ कोणाला ?
वेड लागले दादाला !
मला कुणाचे ? ताईला !

तुज पगडी, मज चिरडी !
आणखी शेला कोणाला ?
दादा, सांगू बाबांला ?
सांग तिकडच्या स्वारीला !

खुसू खुसू, गालि हसू
वरवर अपुले रुसू रुसू 
चल निघ, येथे नको बसू
घर तर माझे तसू तसू.

कशी कशी, आज अशी
गंमत ताईची खाशी !
अता कट्टी फू दादाशी
तर मग गट्टी कोणाशी ?


-------भा. रा. तांबे

ya balano ya re ya lyrics / या बाळांनो, या रे या

या बाळांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा

स्वस्थ बसे तोचि फसे
नवभूमी दाविन मी
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया !

खळखळ मंजुळ गाति झरे
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे
सुवास पसरे, रसहि गळे
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया !

पंख पाचुचे मोरांना
टिपति पाखरे मोत्यांना
पंख फडकती घोड्यांना
मौज दिसे ही थोड्यांना
चपलगती हरिण किती !
देखावे, देखावे
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया !

---- भा. रा. तांबे

rajas ji mahali lyrics / राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ?मज्जाव? शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥

----------- संत तुकडोजी महाराज.

utha utha chiu tai lyrics / उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजुनही ?

लगबग पांखरे हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचें मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या ?

बाळाचें मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दूर जाई
भूर भूर, भूर भूर,

- कुसुमाग्रज

khabardar jar lyrics / khabardar jar tach maruni / खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या

सावळ्या:
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे ?
लगाम खेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्‍चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसांतून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !

स्वार:
मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारिसी अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अति भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !

सावळ्या:
आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर की -
किती ते आम्हांला ठाउकी !
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का ?
दाविती फुशारकी का फुका ?
तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी -
आमुच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचे पुढे
देई न जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !

लालभडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनि हळू का हसे ?
त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे एक जणू, दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर -
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इनाम घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या पुन्हा बोल एकदा
"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !"

------- वा. भा पाठक