Tuesday, March 31, 2015

तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा 
ताई, आणखि कोणाला ?
चल रे दादा चहाटळा !

तुज कंठी, मज अंगठी !
आणखि गोफ कोणाला ?
वेड लागले दादाला !
मला कुणाचे ? ताईला !

तुज पगडी, मज चिरडी !
आणखि शेला कोणाला ?
दादा, सांगू बाबांला ?
सांग तिकडच्या स्वारीला !

खुसू खुसू, गालि हसू
वरवर अपुले रुसू रुसू 
चल निघ, येथे नको बसू
घर तर माझे तसू तसू.

कशी कशी, आज अशी
गंमत ताईची खाशी !
अता कट्टी फू दादाशी

तर मग गट्टी कोणाशी ?

--- भा. रा. तांबे

kunachya khandyavar kunache ojhe / kunachya khandyavar kunache oze / कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे

कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे सारे

दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

---आरती प्रभू

Thursday, March 26, 2015

Deva Tujhya Gabharyala / देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही

देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
सांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही
देवा कुठं शोधू तुला मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले

स्वप्न माझे आज नव्याने खुलले
अर्थ सारे स्पर्शाने उलगडले

आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी

का रे तडफड ही ह्या काळजा मधी
घुसमट तुझी रे होते का कधी
माणसाचा तू जल्म घे, डाव जो मांडला मोडू दे

का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे
उत्तरांना प्रश्न कसे हे पडले
अंतरांचे अंतर कसे ना कळले

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

---चित्रपट - दुनियादारी 

Friday, March 20, 2015

Amhi kon mhanuni kay pusashi / आम्ही कोण म्हणूनी काय पुससी

आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

-----केशवसुत

jinku kinva maru / जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू

लढती सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्‍त्राघाता शस्‍त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू

------ ग. दि. माडगूळकर