Sunday, March 12, 2017

denaryane det jave / देणा-याने देत जावे विंदा करंदीकर

देणा-याने देत जावे
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावेत.

कवी ---- विंदा करंदीकर

labhale amhas bhagya bolato marathi / लाभले आमहास भाग्य बोलतो मराठी सुरेश भट

लाभले आमहास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य  एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढा जगात माय मानतो मराठी

आमुच्या  मनामनात दंग ते मराठी
आमुच्या  रगरगात रंगते मराठी
आमुच्या  उरा उरात स्पंदते  मराठी
आमुच्या  नसानसात नाच ते मराठी

आमुच्या  पिलापिलात  जन्मते मराठी
आमुच्या  लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या  मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या  घराघरात वाढते मराठी

आमुच्या  कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते  मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुलया घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी ---- सुरेश भट 

Wednesday, March 1, 2017

Anandi Anand Gade Ekade Tikade chohikade / आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंद गडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते? मोदाला, मोद भेटला का त्याला?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी आनंद गडे

---- गीतकार : बालकवी