Tuesday, January 27, 2015

gori gori pan fulasarkhi chan lyrics / गोरी गोरीपान, फुलासारखी छान

गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण

गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान !

-----------ग. दि. माडगूळकर

ruperi valut madanchya banat lyrics / रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना

रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावीत प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना

बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा... असा शहारा

लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीतगीत गाती
तू ये निशा अशी करी पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा... तुझा निवारा

--------शांताराम नांदगावकर

shur amhi sardar amhala lyrics / शूर अम्ही सरदार अम्हला काय कुनाची भीती ?

शूर अम्ही सरदार अम्हला काय कुनाची भीती ?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती !

झुंजावं वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया ममता नाती !
----------शांता शेळके

kalya matit matit lyrics / काळ्या मातीत मातीत तिफन चालते

काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो,
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो

सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाकतो मैना वाटुली पाहते

सर्जा रं माझ्या ढवळ्या रं माझ्या पवळ्या रं माझ्या

झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हा जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते

चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काट पायांत रुततो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं

------------- विठ्ठल वाघ

chimb pavsan raan jhal lyrics / चिंब पावसानं रानं झालं

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी

झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी

-------ना. धो. महानोर

preeticha zul zul pani lyrics / प्रीतीचं झुळझुळ पाणी

प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी

हा जीव वेडा होई थोडा थोडा, वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा, चल प्रेमाचा रंगू दे विडा
साजणा तुझी मी कामिनी


मी धुंद झाले मन मोर डोले, पिसाऱ्यातून हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे - खुळी मीच झाले, स्वप्न फुलोरा मनात झुले
मी तुझा हंस ग मानिनी

ही तान नाचे आसावरीची, मांडी नव्हे ही उशी सावरीची
सोबत लाभे मला ही परीची, किती स्वाद घेऊ सरेना रुची
सजणा वेळ का मिलनी

------- मुरलीधर गोडे

Wednesday, January 21, 2015

aajichya javali ghadyal kasale / आजीच्या जवळी घड्याळ कसले

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

- केशवकुमार 

Tap Tap Takit Tapa Chale Maza Ghoda / टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

- शांता शेळके 

gai panyavar kay lyrics / गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या 
का गंगायमुनाहि या मिळाल्या 
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला 

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजूनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला 'लंकेच्या पार्वती' समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
'अहा ! - आली ही पहा - भिकारीण !'

पंकसंपर्के कमळ का भिकारी 
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी 
सूत्रसंगे सुमहार का भिकारी 
कशी तूही मग मजमुळे भिकारी 

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे;
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परि आवरि हा प्रलय महाभारी !

प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे,
कोड किंचित्पुरविता ये त्यांचे;
तदा बापाचे हृदय कसे होते,
नये वदतां, अनुभवी जाणती ते !

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना 
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार पदलुनी ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा

वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !

-------कवि ’बी’