Thursday, May 29, 2014

darshan dere bhagwanta lyrics / darshan de re de re bhagwanta lyrics / darshan dere dere bhagwanta lyrics / दर्शन देरे, देरे भगवंता / दर्शन दे रे, दे रे भगवंता

दर्शन देरे, देरे भगवंता
किती अंत आता पहाशी अनंता

माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू  गोऱ्या कुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता

ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता

तूच जन्मदेता, तूच विश्वकर्ता
मन शांत होई, तुझे गुण गाता
हिच एक आशा, पुरवी तू आता

दर्शन देरे, देरे भगवंता



Darśana dērē, dērē bhagavantā
Kitī anta ātā pahāśī anantā

Māya pityācī sēvā puṇḍalikācī
Bhaktī pāhilī tū gōṟyā kumbhārācī
Taisē yēṇē vhāvē tujhē kr̥pāvantā

Aikatāca vāṇī santa cōkhōbācī
Sākṣāta pragaṭē mūrtī viṭhṭhalācī
Aisē dāna dēśī tujhyā priya santā

Tūca janmadētā, tūca viśvakartā
Mana śānta hō'ī, tujhē guṇa gātā
Hica ēka āśā, puravī tū ātā

Darśana dērē, dērē bhagavantā

Wednesday, May 28, 2014

vitthal aawadi prembhav lyrics / vitthal namacha re taho lyrics / विठ्ठल आवाडी प्रेम भाव / विठ्ठल नामाचा रे टाहो

विठ्ठल आवाडी प्रेम भाव
विठ्ठल नामाचा रे टाहो

तुटला हा संदेहों
भवमुळ व्याधिचा
विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव

महान नरहरी उच्चार
कृष्ण हरी श्रीधर
विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव

हेची नाम आम्हा सर
संसार करावया प्रेम भाव
विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव

नेऊन नमविन काही
विठ्ठल कृष्ण लवलाही
विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव

नामा म्हणे तरलो पाही
विठ्ठल विठ्ठल म्हणाताची विठ्ठल
विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव 

Thursday, May 22, 2014

Tik tik vajate dokyat lyrics / टिक टिक वाजते डोक्यात

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात

नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने
सोचो तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात
टिक टिक वाजते डोक्यात ...

सूर ही तू, ताल ही तू
रुठे जो चांद वो नूर है तू
आसु ही तू हसू ही तू
ओढ मनाची नि हूरहुर तू
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात
टिक टिक वाजते डोक्यात...

Ṭika ṭika vājatē ḍōkyāta
Dhaḍa dhaḍa vāḍhatē ṭhōkyāta
Kabhī jamīna kadhī nabhī, sampatē antara jhōkyāta

Nāhī jarī sarī tarī bhijatē aṅga pāṇyānē
Sōcō tumhēṁ palabhara bhī barasē sāvana jōmānē
Śimpalyān̄cē śō-pīsa nakō
Jīva aḍakalā mōtyāta
Ṭika ṭika vājatē ḍōkyāta...

Sūra hī tū, tāla hī tū
Ruṭhē jō cānda vō nūra hai tū
Āsu hī tū hasū hī tū
Ōḍha manācī ni hūrahura tū
Rōja navē bhāsa tujhē, vāḍhatē antara śvāsāta
Ṭika ṭika vājatē ḍōkyāta...

Monday, May 19, 2014

vitthala konta ha zenda gheu हाती / विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती / Konata zenda gevu hathi lyrics

जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…साचले मोहाचे धुके घनदाट हो …
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला  कोणता झेंडा घेऊ हाती

आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्याचा देव होता… भलताच त्याचा देव होता…
पुरे झाली आता उगा माथेफोडी दगडात माझा जीव होता… दगडात माझा जीव होता…
उजळावा दिवा म्हणूनिया किती मुक्या बिचार्‍या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
विठ्ठला  कोणता झेंडा घेऊ हाती

बूजगावण्यागत व्यर्थ हे जगणं उभ्या उभ्या संपून जाई…
उभ्या उभ्या संपून जाई…उभ्या उभ्या संपून जाई
अळ रीत रीत माझं बघुनी उमगलं कुंपण इथ शेत खायी…
कुंपण इथ शेत खायी…
भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती तरी झेंडे एगळे, वेगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती


Jagaṇyācyā vārīta miḷēnā vāṭa hō…sācalē mōhācē dhukē ghanadāṭa hō…
Āpalī māṇasaṁ āpalīca nātī tarī kaḷapācī mēṇḍharāsa bhītī
Viṭhṭhalā kōṇatā jhēṇḍā ghē'ū hātī

Ājavara jyān̄cī vāhilī pālakhī bhalatāca tyācā dēva hōtā… bhalatāca tyācā dēva hōtā…
Purē jhālī ātā ugā māthēphōḍī dagaḍāta mājhā jīva hōtā… dagaḍāta mājhā jīva hōtā…
Ujaḷāvā divā mhaṇūniyā kitī mukyā bicār‍yā jaḷatī vātī
Vairī kōṇa āhē ithē kōṇa sāthī
Viṭhṭhalā kōṇatā jhēṇḍā ghē'ū hātī

Būjagāvaṇyāgata vyartha hē jagaṇaṁ ubhyā ubhyā sampūna jā'ī…
Ubhyā ubhyā sampūna jā'ī…ubhyā ubhyā sampūna jā'ī
Aḷa rīta rīta mājhaṁ baghunī umagalaṁ kumpaṇa itha śēta khāyī…
Kumpaṇa itha śēta khāyī…
Bhaktācyā kapāḷī an sārakhīca mātī tarī jhēṇḍē ēgaḷē, vēgaḷyā jātī
Sattēcīca bhaktī sattēcīca prītī
Viṭhṭhalā kōṇatā jhēṇḍā ghē'ū hātī

Thursday, May 15, 2014

pratham tula vandito lyrics / प्रथम तुला वंदितो कृपाळा

प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया

विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया

सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला
तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया

गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता
चिन्तामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता
रिद्धि सिद्धीच्या वरा, दयाळा  देई कृपेची छाया


Prathama tulā vanditō kr̥pāḷā, gajānanā, gaṇarāyā

Vighnavināśaka, guṇijana pālaka, durita timira hārakā
Sukhakāraka tū, duḥkha vidāraka, tūca tujhyāsārakhā
Vakratuṇḍa bramhāṇḍanāyakā, vināyakā prabhurāyā

Sid'dhivināyaka tūca anantā, śivātmajā maṅgalā
Sindūra vadanā, vidyādhiśā, gaṇādhipā vatsalā
Tuca īśvarā sāhya karāvē, hā bhavasindhu tarāyā

Gajavadanā tava rūpa manōhara, śuklāmbara śivasutā
Cintāmaṇī tū aṣṭavināyaka, sakalān̄cī dēvatā
Rid'dhi sid'dhīcyā varā, dayāḷā dē'ī kr̥pēcī chāyā

Tuesday, May 13, 2014

dev chorla maza lyrics / देव चोराला माझा

देव चोराला माझा
देव चोराला माझा
भला थोरला माझा
भला थोरला माझा
देव चोराला माझा

झगमग पाहुनिया
पाठ फिरवूनी गेला

रोषणाई मधे देव
माझा हरवून गेला
नाही उरलेली भक्ती
भावनाही हुरला
देव चोराला माझा


हरवून  गेले संत
काल उरलेले थोर
पावलांचे नसे मोल
आज महागले जोडे
टेकू चरणी माता
असा कोण उरला
देव चोराला माझा

rup pahata lochani lyrics / Roop pahata lochani lyrics / रूप पाहतां लोचनीं

रूप पाहतां लोचनीं ।  
सुख जालें वो साजणी ॥

तो हा विठ्ठल बरवा ।  
तो हा माधव बरवा ॥

बहुतां सुकृतांची जोडी ।  
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥

सर्व सुखाचें आगर ।  
बाप रखुमादेवीवरू ॥


Rūpa pāhatāṁ lōcanīṁ.
Sukha jālēṁ vō sājaṇī.

Tō hā viṭhṭhala baravā.
Tō hā mādhava baravā.

Bahutāṁ sukr̥tān̄cī jōḍī.
Mhaṇuni viṭhṭhalīṁ āvaḍī.

Sarva sukhācēṁ āgara.
Bāpa rakhumādēvīvarū.

runu zunu re bhramara lyrics / रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥

चरणकमळदळू रे भ्रमरा ।
भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥

सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥

सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥


Ruṇujhuṇu ruṇujhuṇu rē bhramarā.
Sāṇḍīṁ tūṁ avaguṇu rē bhramarā.

Caraṇakamaḷadaḷū rē bhramarā.
Bhōgīṁ tūṁ niścaḷu rē bhramarā.

Sumanasugandhu rē bhramarā.
Parimaḷu vidgadu rē bhramarā.

Saubhāgyasundarū rē bhramarā.
Bāpa rakhumādēvivarū rē bhramarā.

mogara phulala lyrics / मोगरा फुलला / Evalese Rop Lavile

मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥

इवलेंसे रोप लावियलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥



Mōgarā phulalā mōgarā phulalā.
Phulēṁ vēn̄citāṁ baharū kaḷiyānsī ālā.

Ivalēnsē rōpa lāviyalēṁ dvārī.
Tyācā vēlu gēlā gaganāvērī.

Manāciyē guntī gumphiyēlā śēlā.
Bāpa rakhumādēvivarī viṭhṭhalēṁ arpilā.

Devachiye dwari lyrics / देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करीं ॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवांघरीं ॥



Dēvāciyē dvārīṁ ubhā kṣaṇabharī.
Tēṇēṁ mukti cārī sādhiyēlyā.

Hari mukhēṁ mhaṇā hari mukhēṁ mhaṇā.
Puṇyācī gaṇanā kōṇa karīṁ.

Asōni sansārīṁ jivhē vēgu karīṁ.
Vēdaśāstra ubhārī bāhyā sadā.

Jñānadēva mhaṇē vyāsāciyē khuṇē.
Dvārakēcē rāṇē pāṇḍavāṅgharīṁ.

Ka Kalena Lyrics - Mumbai Pune Mumbai / का कळेना

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे...
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे...
बंध जुळती हे प्रीतीचे...
गोड नाते हे जन्मांतरीचे...

एक मी एक तू...
शब्द मी गीत तू...
आकाश तू..आभास तू...
साऱ्यात तू...
ध्यास मी श्वास तू...
स्पर्श मी मोहर तू....
स्वप्नात तू सत्यात तू...
साऱ्यात तू...

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे...
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे...
बंध जुळती हे प्रीतीचे...
गोड नाते हे जन्मांतरीचे...

घडले कसे कधी..
कळते न जे कधी..
हळुवार ते आले कसे ओठावरी..
दे ना तू साथ दे..
हातात हात घे..
नजरेतून नजरेतुनी इकरार घे...

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे..
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे..
बंध जुळती हे प्रीतीचे...
गोड नाते हे जन्मांतरीचे..

kandhe pohe lyrics Sanai Choughade / भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी / ayushya he chulivarlya kadhaitle

भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांती
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी 
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
पाने मिटुनी लाजाळू परी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

दूर देशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पाहताना
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

भूत-कालच्या धुवून अक्षता तांदूळ केले ज्यांनी
आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यानी
भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा
हातावरल्या मेहंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

--अवधूत  गुप्ते 

Kadhi Tu Lyrics / कधी तू / Mumbai Pune Mumbai song lyrics

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात

कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू...रिमझिम झरणारी बरसात
कधी तू...चमचम करणारी चांदण्यात

कधी तू...अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेडया जंगलात
कधी तू…हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात

कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात

सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू...रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात

जरी तू...कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

कधी तू...कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात

कधी तू...रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात

--श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे

Khel Mandala from Natrang / खेळ मांडला / tujya payarishi - Natarang / तुझ्या पायरीशी

तुझ्या पायरीशी  कुणी सान थोर नाही
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरना ह्यो भोग कशापाई
हरवली वाट दिशा अंधरल्या धाई
ववाळूनी  उधाळतो  जीव माय बापा
वानवा ह्यो उरी पेटला ||
खेळ मांडला| खेळ मांडला| खेळ मांडला||

सांडली ग रीत भात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव ग खेळ मांडला
दावी  देवा  देवा पैईल पार पाठीशी तू रा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला

उसवाला गाण गोत सार आधार कोणाचा न्हाई
भेगलल्या भुई पर जीना अंगार जीवाला जाळी
बल दे झुंज़ायला कीरपेची ढाल दे
इनविति पंचा प्राण जिव्हारात ताल दे
करपल रान देवा जलाल शिवार
तरी न्हाई धीर सांडला
खेळ मांडला| खेळ मांडला| खेळ मांडला|| 

Monday, May 12, 2014

Vithu Mauli TuMauli Jagachi / विठुमाऊली तू माऊली जगाची

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

Sunday, May 11, 2014

itani Shakti hame dena data / इतनी शक्ती हमे देना दाता

इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्ते पे हम से, भूलकर भी कोई भूल हो ना

दूर अज्ञान के हो अँधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे
हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसी का किसी से, भावना मन में बदले की हो ना

हम ना सोचें हमें क्या मिला हैं, हम यह सोचे किया क्या हैं अर्पन
फूल खुशियों के बाँटे सभी को, सब का जीवन ही बन जाये मधुबन
अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना

Thursday, May 8, 2014

sarvatmaka shivsundara / सर्वात्मका, शिवसुंदरा

सर्वात्मका  शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥

सुमनांत तू, गगनांत तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ 

श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥

न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना ॥


करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥

-- कुसुमाग्रज

Wednesday, May 7, 2014

are khopya madhi khopa lyrics / अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाले टांगला

पिल्लं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

सुगरीण सुगरीण
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगती मिये
गण्या गंप्या नर

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात, दहा बोटं

-- बहिणाबाई 

man vadhay vadhay bahinabai / मन वढाय वढाय

मन वढाय वढाय ,उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला ,फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट, याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्‍यानं चालल्या, पान्यावर्‍हल्या रे लाटा

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं, जसं वारा वहादनं

मन पाखरू पाखरू, याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर
अरे, इचू, साप बरा, त्याले उतारे मंतर !

मन चपय चपय, त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं, जसा खाकसंचा दाना
मन केवढं केवढं ?, आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन, आसं नही दुनियांत !
आसा कसा रे तू योगी, काय तुझी करामत !

देवा आसं कसं मन ?, आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तूले, असं सपनं पडलं !

---बहीणाबाई

ne majasi ne parat matrubhumila / ने मजसी ने परत मातृभूमीला

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला

-- सावरकर 

ek tutari dya maj anuni / एक तुतारी द्या मज आणुनी

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सारी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,
अशी तुतारी द्या मजलागुनि
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर,ह्या बंडावर
शुरांनो या त्वरा करा रे
समते चा ध्वज उंच धारा रे
नीती ची द्वाही फिरवा रे
तुतारीच्या या सुरा बरोबर

-- केशवसुत 

are sansar sansar Bahinabai Chaudhari / अरे, संसार संसार

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्‍ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जिवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जिवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जिवाचा आधार

---बहिणाबाई  चौधरी 

olakhalat ka sir mala pawasat aala koni / ओळखलात का सर मला पावसात आला कोणी.

ओळखलात का सर मला  पावसात आला कोणी..
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पुन्हा..
गंगमाई पाहुनी आली, गेली घरट्यात राहुन
माहेरवाशीण पोरीसारखी ,चार भिंतित नाचली..
मोकळ्या हाती जाईल, कशी बायको मात्रा वाचली
भिंत खचली , चूल भिजली, होते नव्हते नेले..
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे  ठेवले

कारभारणीला घेऊन सांगे, सर आता लढतो आहे..
चिखल गाल काढतो आहे  ,पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात  जातच, हसत हसत उठला..
पैसे नकोत सर,  जरा एकटेपणा वाटला
मोडुं पडला संसार तरी मोडला नाही कणा..
पाठीवरती हात  ठेऊन नुसते 'लढ' म्हणा

-- कवी कुसुमाग्रज 

Keshava madhava tujya namat re godava / केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गायी हाकिशी गोकुळी यादवा

वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा

Dnyaneshwari by Sant Dnyaneshwar [ Part 18.2 ] / [ AdhyAya 18 bhag2 ]

परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि ।
श्रीगुरुकृपालब्धि\- । काळीं पावे ॥ ९८४ ॥
उदयतांचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु ।
कां दीपसंगें कापुरु । दीपुचि होय ॥ ९८५ ॥
तया लवणाची कणिका । मिळतखेंवो उदका ।
उदकचि होऊनि देखा । ठाके जेवीं ॥ ९८६ ॥
कां निद्रितु चेवविलिया । स्वप्नेंसि नीद वायां ।
जाऊनि आपणपयां । मिळे जैसा ॥ ९८७ ॥
तैसें जया कोण्हासि दैवें । गुरुवाक्यश्रवणाचि सवें ।
द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती ॥ ९८८ ॥
तयासी मग कर्म करणें । हें बोलिजैलचि कवणें ।
आकाशा येणें जाणें । आहे काई ? । ॥ ९८९ ॥
म्हणौनि तयासि कांहीं । त्रिशुद्धि करणें नाहीं ।
परी ऐसें जरी हें कांहीं । नव्हे जया ॥ ९९० ॥
कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पैं किरीटी ।
वस्तु होऊनि उठी । कवणि एकु जो ॥ ९९१ ॥
येऱ्हवीं स्वकर्माचेनि वन्ही । काम्यनिषिद्धाचिया इंधनीं ।
रजतमें कीर दोन्ही । जाळिलीं आधीं ॥ ९९२ ॥
पुत्र वित्त परलोकु । यया तिहींचा अभिलाखु ।
घरीं होय पाइकु । हेंही जालें ॥ ९९३ ॥
इंद्रियें सैरा पदार्थीं । रिगतां विटाळलीं होतीं ।
तिये प्रत्याहार तीर्थीं । न्हाणिलीं कीर ॥ ९९४ ॥
आणि स्वधर्माचें फळ । ईश्वरीं अर्पूनि सकळ ।
घेऊनि केलें अढळ । वैराग्यपद ॥ ९९५ ॥
ऐसी आत्मसाक्षात्कारीं । लाभे ज्ञानाची उजरी ।
ते सामुग्री कीर पुरी । मेळविली ॥ ९९६ ॥
आणि तेचि समयीं । सद्गुरु भेटले पाहीं ।
तेवींचि तिहीं कांहीं । वंचिजेना ॥ ९९७ ॥
परी वोखद घेतखेंवो । काय लाभे आपला ठावो ? ।
कां उदयजतांचि दिवो । मध्यान्ह होय ? ॥ ९९८ ॥
सुक्षेत्रीं आणि वोलटें । बीजही पेरिलें गोमटें ।
तरी आलोट फळ भेटे । परी वेळे कीं गा ॥ ९९९ ॥
जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु ।
तरी पाविजे वांचूनि वेळु । लागेचि कीं ॥ १००० ॥
तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला ।
जीवीं अंकुरु फुटला । विवेकाचा ॥ १००१ ॥
तेणें ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती ।
हेही कीर प्रतीती । गाढ केली ॥ १००२ ॥
परी तेंचि जें परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम ।
मोक्षाचेंही काम । सरे जेथ ॥ १००३ ॥
यया तिन्ही अवस्था पोटीं । जिरवी जें गा किरीटी ।
तया ज्ञानासिही मिठी । दे जे वस्तु ॥ १००४ ॥
ऐक्याचें एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे ।
कांहींचि नुरोनि उरे । जें कांहीं गा ॥ १००५ ॥
तियें ब्रह्मीं ऐक्यपणें । ब्रह्मचि होऊनि असणें ।
तें क्रमेंचि करूनि तेणें । पाविजे पैं ॥ १००६ ॥
भुकेलियापासीं । वोगरिलें षड्रसीं ।
तो तृप्ति प्रतिग्रासीं । लाहे जेवीं ॥ १००७ ॥
तैसा वैराग्याचा वोलावा । विवेकाचा तो दिवा ।
आंबुथितां आत्मठेवा । काढीचि तो ॥ १००८ ॥
तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी ।
जयाच्या आंगीं निरवधी । लेणें जाली ॥ १००९ ॥
तो जेणें क्रमें ब्रह्म । होणें करी गा सुगम ।
तया क्रमाचें आतां वर्म । आईक सांगों ॥ १०१० ॥


बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ ५१॥


तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा ।
धुऊनियां मळकटा । बुद्धीचा तेणें ॥ १०११ ॥
मग राहूनें उगळिली । प्रभा चंद्रें आलिंगिली ।
तैसी शुद्धत्वें जडली । आपणयां बुद्धि ॥ १०१२ ॥
सांडूनि कुळें दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी ।
द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं । पडली तैसी ॥ १०१३ ॥
आणि ज्ञान ऐसें जिव्हार । नेवों नेवों निरंतर ।
इंद्रियीं केले थोर । शब्दादिक जे ॥ १०१४ ॥
ते रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया ।
तैसें वृत्तिरोधें तयां । पांचांही केलें ॥ १०१५ ॥
नेणतां अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना ।
तैसीं वोकविली सवासना । इंद्रियें विषयीं ॥ १०१६ ॥
मग प्रत्यगावृत्ती चोखटें । लाविलीं गंगेचेनि तटें ।
ऐसीं प्रायश्चित्तें धुवटें । केलीं येणें ॥ १०१७ ॥
पाठीं सात्विकें धीरें तेणें । शोधारलीं तियें करणें ।
मग मनेंसीं योगधारणें । मेळविलीं ॥ १०१८ ॥
तेवींचि प्राचीनें इष्टानिष्टें । भोगेंसीं येउनी भेटे ।
तेथ देखिलियाही वोखटें । द्वेषु न करी ॥ १०१९ ॥
ना गोमटेंचि विपायें । तें आणूनि पुढां सूये ।
तयालागीं न होये । साभिलाषु ॥ १०२० ॥
यापरी इष्टानिष्टींंं । रागद्वेष किरीटी ।
त्यजूनि गिरिकपाटीं । निकुंजीं वसे ॥ १०२१ ॥


विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ ५२॥


गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया ।
अंगाचियाचि मांदिया । एकलेया ॥ १०२२ ॥
शमदमादिकीं खेळे । न बोलणेंचि चावळे ।
गुरुवाक्याचेनि मेळें । नेणे वेळु ॥ १०२३ ॥
आणि आंगा बळ यावें । नातरी क्षुधा जावें ।
कां जिभीचे पुरवावे । मनोरथ ॥ १०२४ ॥
भोजन करितांविखीं । ययां तिहींतें न लेखी ।
आहारीं मिती संतोषीं । माप न सूये ॥ १०२५ ॥
अशनाचेनि पावकें । हारपतां प्राणु पोखे ।
इतुकियाचि भागु मोटकें । अशन करी ॥ १०२६ ॥
आणि परपुरुषें कामिली । कुळवधू आंग न घाली ।
निद्रालस्या न मोकली । आसन तैसें ॥ १०२७ ॥
दंडवताचेनि प्रसंगें । भुयीं हन अंग लागे ।
वांचूनि येर नेघे । राभस्य तेथ ॥ १०२८ ॥
देहनिर्वाहापुरतें । राहाटवी हातांपायांतें ।
किंबहुना आपैतें । सबाह्य केलें ॥ १०२९ ॥
आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखों नेदी वीरा ।
तेथ कें वाग्व्यापारा । अवकाशु असे ? ॥ १०३० ॥
ऐसेनि देह वाचा मानस । हें जिणौनि बाह्यप्रदेश ।
आकळिलें आकाश । ध्यानाचें तेणें ॥ १०३१ ॥
गुरुवाक्यें उठविला । बोधीं निश्चयो आपुला ।
न्याहाळीं हातीं घेतला । आरिसा जैसा ॥ १०३२ ॥
पैं ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारीं ।
ध्येयत्वें घे हे अवधारीं । ध्यानरूढी गा ॥ १०३३ ॥
तेथ ध्येय ध्यान ध्याता । ययां तिहीं एकरूपता ।
होय तंव पंडुसुता । कीजे तें गा ॥ १०३४ ॥
म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानीं जाला दक्षु ।
परी पुढां सूनि पक्षु । योगाभ्यासाचा ॥ १०३५ ॥
अपानरंध्रद्वया । माझारीं धनंजया ।
पार्ष्णीं पिडूनियां । कांवरुमूळ ॥ १०३६ ॥
आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध ।
करूनि एकवद । वायुभेदी ॥ १०३७ ॥
कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकाशूनि ।
आधारादि भेदूनि । आज्ञावरी ॥ १०३८ ॥
सहस्त्रदळाचा मेघु । पीयुषें वर्षोनि चांगु ।
तो मूळवरी वोघु । आणूनियां ॥ १०३९ ॥
नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाच्या खापरीं ।
मनपवनाची खीच पुरी । वाढूनियां ॥ १०४० ॥
जालिया योगाचा गाढा । मेळावा सूनि हा पुढां ।
ध्यान मागिलीकडां । स्वयंभ केलें ॥ १०४१ ॥
आणि ध्यान योग दोन्ही । इयें आत्मतत्वज्ञानीं ।
पैठा होआवया निर्विघ्नीं । आधींचि तेणें ॥ १०४२ ॥
वीतरागतेसारिखा । जोडूनि ठेविला सखा ।
तो आघवियाचि भूमिका- । सवें चाले ॥ १०४३ ॥
पहावें दिसे तंववरी । दिठीतें न संडी दीप जरी ।
तरी कें आहे अवसरी । देखावया ॥ १०४४ ॥
तैसें मोक्षीं प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मीं जाय लया ।
तंव वैराग्य आथी तया । भंगु कैचा । ॥ १०४५ ॥
म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु ।
करूनि जाला योग्यु । आत्मलाभा ॥ १०४६ ॥
ऐसी वैराग्याची आंगीं । बाणूनियां वज्रांगीं ।
राजयोगतुरंगीं । आरूढला ॥ १०४७ ॥
वरी आड पडिलें दिठी । सानें थोर निवटी ।
तें बळीं विवेकमुष्टीं । ध्यानाचें खांडें ॥ १०४८ ॥
ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारीं सूर्य तैसा असे जातु ।
मोक्षविजयश्रीये वरैतु । होआवयालागीं ॥ १०४९ ॥


अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५३॥


तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपटिले ।
तयांमाजीं पहिलें । देहाहंकारु ॥ १०५० ॥
जो न मोकली मारुनी । जीवों नेदी उपजवोनि ।
विचंबवी खोडां घालुनी । हाडांचिया ॥ १०५१ ॥
तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा ।
आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ॥ १०५२ ॥
जो विषयाचेनि नांवें । चौगुणेंही वरी थांवे ।
जेणें मृतावस्था धांवे । सर्वत्र जगा ॥ १०५३ ॥
तो विषय विषाचा अथावो । आघविया दोषांचा रावो ।
परी ध्यानखड्गाचा घावो । साहेल कैंचा ? ॥ १०५४ ॥
आणि प्रिय विषयप्राप्ती । करी जया सुखाची व्यक्ती ।
तेचि घालूनि बुंथी । आंगीं जो वाजे ॥ १०५५ ॥
जो सन्मार्गा भुलवी । मग अधर्माच्या आडवीं ।
सूनि वाघां सांपडवी । नरकादिकां ॥ १०५६ ॥
तो विश्वासें मारितां रिपु । निवटूनि घातला दर्पु ।
आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥ १०५७ ॥
क्रोधा ऐसा महादोखु । जयाचा देखा परिपाकु ।
भरिजे तंव अधिकु । रिता होय जो ॥ १०५८ ॥
तो कामु कोणेच ठायीं । नसे ऐसें केलें पाहीं ।
कीं तेंचि क्रोधाही । सहजें आलें ॥ १०५९ ॥
मुळाचें तोडणें जैसें । होय कां शाखोद्देशें ।
कामु नाशलेनि नाशे । तैसा क्रोधु ॥ १०६० ॥
म्हणौनि काम वैरी । जाला जेथ ठाणोरी ।
तेथ सरली वारी । क्रोधाचीही ॥ १०६१ ॥
आणि समर्थु आपुला खोडा । शिसें वाहवी जैसा होडा ।
तैसा भुंजौनि जो गाढा । परीग्रहो ॥ १०६२ ॥
जो माथांचि पालाणवी । अंगा अवगुण घालवी ।
जीवें दांडी घेववी । ममत्वाची ॥ १०६३ ॥
शिष्यशास्त्रादिविलासें । मठादिमुद्रेचेनि मिसें ।
घातले आहाती फांसे । निःसंगा जेणें ॥ १०६४ ॥
घरीं कुटुंबपणें सरे । तरी वनीं वन्य होऊनि अवतरे ।
नागवीयाही शरीरें । लागला आहे ॥ १०६५ ॥
ऐसा दुर्जयो जो परीग्रहो । तयाचा फेडूनि ठावो ।
भवविजयाचा उत्साहो । भोगीतसे जो ॥ १०६६ ॥
तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणाचे जे मेळावे ।
ते कैवल्यदेशींचे आघवे । रावो जैसे आले ॥ १०६७ ॥
तेव्हां सम्यक्‌ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया ।
परिवारु होऊनियां । राहत आंगें ॥ १०६८ ॥
प्रवृत्तीचिये राजबिदीं । अवस्थाभेदप्रमदीं ।
कीजत आहे प्रतिपदीं । सुखाचें लोण ॥ १०६९ ॥
पुढां बोधाचिये कांबीवरी । विवेकु दृश्याची मांदी सारी ।
योगभूमिका आरती करी । येती जैसिया ॥ १०७० ॥
तेथ ऋद्धिसिद्धींचीं अनेगें । वृंदें मिळती प्रसंगें ।
तिये पुष्पवर्षीं आंगें । नाहातसे तो ॥ १०७१ ॥
ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखें । स्वराज्य येतां जवळिकें ।
झळंबित आहे हरिखें । तिन्ही लोक ॥ १०७२ ॥
तेव्हां वैरियां कां मैत्रियां । तयासि माझें म्हणावया ।
समानता धनंजया । उरेचिही ना ॥ १०७३ ॥
हें ना भलतेणें व्याजें । तो जयातें म्हणे माझें ।
तें नोडवेचि कां दुजें । अद्वितीय जाला ॥ १०७४ ॥
पैं आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळूनिया पंडुसुता ।
कहीं न लगती ममता । धाडिली तेणें ॥ १०७५ ॥
ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हें जगु ।
अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला ॥ १०७६ ॥
वैराग्याचें गाढलें । अंगी त्राण होतें भलें ।
तेंही नावेक ढिलें । तेव्हां करी ॥ १०७७ ॥
आणि निवटी ध्यानाचें खांडें । तें दुजें नाहींचि पुढें ।
म्हणौनि हातु आसुडें । वृत्तीचाही ॥ १०७८ ॥
जैसें रसौषध खरें । आपुलें काज करोनि पुरें ।
आपणही नुरे । तैसें होतसे ॥ १०७९ ॥
देखोनि ठाकिता ठावो । धांवता थिरावे पावो ।
तैसा ब्रह्मसामीप्यें थावो । अभ्यासु सांडी ॥ १०८० ॥
घडतां महोदधीसी । गंगा वेगु सांडी जैसी ।
कां कामिनी कांतापासीं । स्थिर होय ॥ १०८१ ॥
नाना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुळे ।
कां गांवापुढें वळे । मार्गु जैसा ॥ १०८२ ॥
तैसा आत्मसाक्षात्कारु । होईल देखोनि गोचरु ।
ऐसा साधनहतियेरु । हळुचि ठेवी ॥ १०८३ ॥
म्हणौनि ब्रह्मेंसी तया । ऐक्याचा समो धनंजया ।
होतसे तैं उपाया । वोहटु पडे ॥ १०८४ ॥
मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य ।
योगफळाचाही परिपाक । दशा जे कां ॥ १०८५ ॥
ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु ॥ १०८६ ॥
पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुलें उणेपण शशी ।
कां सोळे पाऊनि जैसी । पंधरावी वानी ॥ १०८७ ॥
सागरींही पाणी वेगें । संचरे तें रूप गंगे ।
येर निश्चळ जें उगें । तें समुद्रु जैसा ॥ १०८८ ॥
ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाडु आहे ।
तेंचि शांतीचेनि लवलाहें । होय तो गा ॥ १०८९ ॥
पैं तेंचि होणेंनवीण । प्रतीती आलें जें ब्रह्मपण ।
ते ब्रह्म होती जाण । योग्यता येथ ॥ १०९० ॥


ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काण्‌क्षति ।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॥ ५४॥


ते ब्रह्मभावयोग्यता । पुरुषु तो मग पंडुसुता ।
आत्मबोधप्रसन्नता\- । पदीं बैसे ॥ १०९१ ॥
जेणें निपजे रससोय । तो तापुही जैं जाय ।
तैं ते कां होय । प्रसन्न जैसी ॥ १०९२ ॥
नाना भरतिया लगबगा । शरत्काळीं सांडिजे गंगा ।
कां गीत रहातां उपांगा । वोहटु पडे ॥ १०९३ ॥
तैसा आत्मबोधीं उद्यमु । करितां होय जो श्रमु ।
तोही जेथें समु । होऊनि जाय ॥ १०९४ ॥
आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती ।
ते भोगितसे महामती । योग्यु तो गा ॥ १०९५ ॥
तेव्हां आत्मत्वें शोचावें । कांहीं पावावया कामावें ।
हें सरलें समभावें । भरितें तया ॥ १०९६ ॥
उदया येतां गभस्ती । नाना नक्षत्रव्यक्ती ।
हारवीजती दीप्ती । आंगिका जेवीं ॥ १०९७ ॥
तेवीं उठतिया आत्मप्रथा । हे भूतभेदव्यवस्था ।
मोडीत मोडीत पार्था । वास पाहे तो ॥ १०९८ ॥
पाटियेवरील अक्षरें । जैसीं पुसतां येती करें ।
तैसीं हारपती भेदांतरें । तयाचिये दृष्टी ॥ १०९९ ॥
तैसेनि अन्यथा ज्ञानें । जियें घेपती जागरस्वप्नें ।
तियें दोन्ही केलीं लीनें । अव्यक्तामाजीं ॥ ११०० ॥
मग तेंही अव्यक्त । बोध वाढतां झिजत ।
पुरलां बोधीं समस्त । बुडोनि जाय ॥ ११०१ ॥
जैसी भोजनाच्या व्यापारीं । क्षुधा जिरत जाय अवधारीं ।
मग तृप्तीच्या अवसरीं । नाहींच होय ॥ ११०२ ॥
नाना चालीचिया वाढी । वाट होत जाय थोडी ।
मग पातला ठायीं बुडी । देऊनि निमे ॥ ११०३ ॥
कां जागृति जंव जंव उद्दीपे । तंव तंव निद्रा हारपे ।
मग जागीनलिया स्वरूपें । नाहींच होय ॥ ११०४ ॥
हें ना आपुलें पूर्णत्व भेटें । जेथ चंद्रासीं वाढी खुंटे ।
तेथ शुक्लपक्षु आटे । निःशेषु जैसा ॥ ११०५ ॥
तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधें ये मज आंतु ।
मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला ॥ ११०६ ॥
तेव्हां कल्पांताचिये वेळे । नदी सिंधूचें पेंडवळें ।
मोडूनि भरलें जळें । आब्रह्म जैसें ॥ ११०७ ॥
नाना गेलिया घट मठ । आकाश ठाके एकवट ।
कां जळोनि काष्ठें काष्ठ । वन्हीचि होय ॥ ११०८ ॥
नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे ।
नामरूप भेदें जैसें । सांडिजे सोनें ॥ ११०९ ॥
हेंही असो चेइलया । तें स्वप्न नाहीं जालया ।
मग आपणचि आपणयां । उरिजे जैसें ॥ १११० ॥
तैसी मी एकवांचूनि कांहीं । तया तयाहीसकट नाहीं ।
हे चौथी भक्ति पाहीं । माझी तो लाहे ॥ ११११ ॥
येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथीं ।
ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे ॥ १११२ ॥
येऱ्हवीं तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती ।
पैं माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ॥ १११३ ॥
जें नेणणें माझें प्रकाशूनि । अन्यथात्वें मातें दाऊनि ।
सर्वही सर्वीं भजौनि । बुझावीतसे जे ॥ १११४ ॥
जो जेथ जैसें पाहों बैसे । तया तेथ तैसेंचि असे ।
हें उजियेडें कां दिसे । अखंडें जेणें ॥ १११५ ॥
स्वप्नाचें दिसणें न दिसणें । जैसें आपलेनि असलेपणें ।
विश्वाचें आहे नाहीं जेणें । प्रकाशें तैसें ॥ १११६ ॥
ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा ।
तो भक्ति या वोजा । बोलिजे गा ॥ १११७ ॥
म्हणौनि आर्ताच्या ठायीं । हे आर्ति होऊनि पाहीं ।
अपेक्षणीय जें कांहीं । तें मीचि केला ॥ १११८ ॥
जिज्ञासुपुढां वीरेशा । हेचि होऊनि जिज्ञासा ।
मी कां जिज्ञास्यु ऐसा । दाखविला ॥ १११९ ॥
हेंचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थीं अर्जुना ।
करूनि अर्थाभिधाना । आणी मातें ॥ ११२० ॥
एवं घेऊनि अज्ञानातें । माझी भक्ति जे हे वर्ते ।
ते दावी मज द्रष्टयातें । दृश्य करूनि ॥ ११२१ ॥
येथें मुखचि दिसे मुखें । या बोला कांहीं न चुके ।
तरी दुजेपण हें लटिकें । आरिसा करी ॥ ११२२ ॥
दिठी चंद्रचि घे साचें । परी येतुलें हें तिमिराचें ।
जे एकचि असे तयाचे । दोनी दावी ॥ ११२३ ॥
तैसा सर्वत्र मीचि मियां । घेपतसें भक्ति इया ।
परी दृश्यत्व हें वायां । अज्ञानवशें ॥ ११२४ ॥
तें अज्ञान आतां फिटलें । माझें दृष्टृत्व मज भेटलें ।
निजबिंबीं एकवटलें । प्रतिबिंब जैसें ॥ ११२५ ॥
पैं जेव्हांही असे किडाळ । तेव्हांही सोनेंचि अढळ ।
परी तें कीड गेलिया केवळ । उरे जैसें ॥ ११२६ ॥
हां गा पूर्णिमे आधीं कायी । चंद्रु सावयवु नाहीं ? ।
परी तिये दिवशीं भेटे पाहीं । पूर्णता तया ॥ ११२७ ॥
तैसा मीचि ज्ञानद्वारें । दिसें परी हस्तांतरें ।
मग दृष्टृत्व तें सरे । मियांचि मी लाभें ॥ ११२८ ॥
म्हणौनि दृश्यपथा- । अतीतु माझा पार्था ।
भक्तियोगु चवथा । म्हणितला गा ॥ ११२९ ॥


भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥ ५५॥


या ज्ञान भक्ति सहज । भक्तु एकवटला मज ।
मीचि केवळ हें तुज । श्रुतही आहे ॥ ११३० ॥
जे उभऊनियां भुजा । ज्ञानिया आत्मा माझा ।
हे बोलिलों कपिध्वजा । सप्तमाध्यायीं ॥ ११३१ ॥
ते कल्पादीं भक्ति मियां । श्रीभागवतमिषें ब्रह्मया ।
उत्तम म्हणौनि धनंजया । उपदेशिली ॥ ११३२ ॥
ज्ञानी इयेतें स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती ।
आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो ॥ ११३३ ॥
हे मज मिळतिये वेळे । तया क्रमयोगियां फळे ।
मग समस्तही निखिळें । मियांचि भरे ॥ ११३४ ॥
तेथ वैराग्य विवेकेंसी । आटे बंध मोक्षेंसीं ।
वृत्ती तिये आवृत्तीसीं । बुडोनि जाय ॥ ११३५ ॥
घेऊनि ऐलपणातें । परत्व हारपें जेथें ।
गिळूनि चाऱ्ही भूतें । आकाश जैसें ॥ ११३६ ॥
तया परी थडथाद । साध्यसाधनातीत शुद्ध ।
तें मी होऊनि एकवद । भोगितो मातें ॥ ११३७ ॥
घडोनि सिंधूचिया आंगा । सिंधूवरी तळपे गंगा ।
तैसा पाडु तया भोगा । अवधारी जो ॥ ११३८ ॥
कां आरिसयासि आरिसा । उटूनि दाविलिया जैसा ।
देखणा अतिशयो तैसा । भोगणा तिये ॥ ११३९ ॥
हे असो दर्पणु नेलिया । तो मुख बोधुही गेलिया ।
देखलेंपण एकलेया । आस्वादिजे जेवीं ॥ ११४० ॥
चेइलिया स्वप्न नाशे । आपलें ऐक्यचि दिसे ।
ते दुजेनवीण जैसें । भोगिजे का ॥ ११४१ ॥
तोचि जालिया भोगु तयाचा । न घडे हा भावो जयांचा ।
तिहीं बोलें केवीं बोलाचा । उच्चारु कीजे ॥ ११४२ ॥
तयांच्या नेणों गांवीं । रवी प्रकाशी हन दिवी ।
कीं व्योमालागीं मांडवी । उभिली तिहीं ॥ ११४३ ॥
हां गा राजन्यत्व नव्हतां आंगीं । रावो रायपण काय भोगी ? ।
कां आंधारु हन आलिंगी । दिनकरातें ? ॥ ११४४ ॥
आणि आकाश जें नव्हे । तया आकाश काय जाणवे ? ।
रत्नाच्या रूपीं मिरवे । गुंजांचें लेणें ? ॥ ११४५ ॥
म्हणौनि मी होणें नाहीं । तया मीचि आहें केहीं ।
मग भजेल हें कायी । बोलों कीर ॥ ११४६ ॥
यालागीं तो क्रमयोगी । मी जालाचि मातें भोगी ।
तारुण्य कां तरुणांगीं । जियापरी ॥ ११४७ ॥
तरंग सर्वांगीं तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबीं ।
नाना अवकाश नभीं । लुंठतु जैसा ॥ ११४८ ॥
तैसा रूप होऊनि माझें । मातें क्रियावीण तो भजे ।
अलंकारु का सहजें । सोनयातें जेवीं ॥ ११४९ ॥
का चंदनाची द्रुती जैसी । चंदनीं भजे अपैसी ।
का अकृत्रिम शशीं । चंद्रिका ते ॥ ११५० ॥
तैसी क्रिया कीर न साहे । तऱ्ही अद्वैतीं भक्ति आहे ।
हें अनुभवाचिजोगें नव्हे । बोला{ऐ}सें ॥ ११५१ ॥
तेव्हां पूर्वसंस्कार छंदें । जें कांहीं तो अनुवादे ।
तेणें आळविलेनि वो दें । बोलतां मीचि ॥ ११५२ ॥
बोलतया बोलताचि भेटे । तेथें बोलिलें हें न घटे ।
तें मौन तंव गोमटें । स्तवन माझें ॥ ११५३ ॥
म्हणौनि तया बोलतां । बोली बोलतां मी भेटतां ।
मौन होय तेणें तत्वतां । स्तवितो मातें ॥ ११५४ ॥
तैसेंचि बुद्धी का दिठी । जें तो देखों जाय किरीटी ।
तें देखणें दृश्य लोटी । देखतेंचि दावी ॥ ११५५ ॥
आरिसया आधीं जैसें । देखतेंचि मुख दिसेअ ।
तयाचें देखणें तैसें । मेळवी द्रष्टें ॥ ११५६ ॥
दृश्य जाउनियां द्रष्टें । द्रष्टयासीचि जैं भेटे ।
तैं एकलेपणें न घटे । द्रष्टेपणही ॥ ११५७ ॥
तेथ स्वप्नींचिया प्रिया । चेवोनि झोंबो गेलिया ।
ठायिजे दोन्ही न होनियां । आपणचि जैसें ॥ ११५८ ॥
का दोहीं काष्ठाचिये घृष्टी\- । माजीं वन्हि एक उठी ।
तो दोन्ही हे भाष आटी । आपणचि होय ॥ ११५९ ॥
नाना प्रतिबिंब हातीं । घेऊं गेलिया गभस्ती ।
बिंबताही असती । जाय जैसी ॥ ११६० ॥
तैसा मी होऊनि देखतें । तो घेऊं जाय दृश्यातें ।
तेथ दृश्य ने थितें । द्रष्टृत्वेंसीं ॥ ११६१ ॥
रवि आंधारु प्रकाशिता । नुरेचि जेवीं प्रकाश्यता ।
तेंवीं दृश्यीं नाही द्रष्टृता । मी जालिया ॥ ११६२ ॥
मग देखिजे ना न देखिजे । ऐसी जे दशा निपजे ।
ते तें दर्शन माझें । साचोकारें ॥ ११६३ ॥
तें भलतयाही किरीटी । पदार्थाचिया भेटी ।
द्रष्टृदृश्यातीता दृष्टी । भोगितो सदा ॥ ११६४ ॥
आणि आकाश हें आकाशें । दाटलें न ढळें जैसें ।
मियां आत्मेन आपणपें तैसें । जालें तया ॥ ११६५ ॥
कल्पांतीं उदक उदकें । रुंधिलिया वाहों ठाके ।
तैसा आत्मेनि मियां येकें । कोंदला तो ॥ ११६६ ॥
पावो आपणपयां वोळघे ? । केवीं वन्हि आपणपयां लागे ? ।
आपणपां पाणी रिघे । स्नाना कैसें ? ॥ ११६७ ॥
म्हणौनि सर्व मी जालेपणें । ठेलें तया येणें जाणें ।
तेंचि गा यात्रा करणें । अद्वया मज ॥ ११६८ ॥
पैं जळावरील तरंगु । जरी धाविन्नला सवेगु ।
तरी नाहीं भूमिभागु । क्रमिला तेणें ॥ ११६९ ॥
जें सांडावें कां मांडावें । जें चालणें जेणें चालावें ।
तें तोयचि एक आघवें । म्हणौनियां ॥ ११७० ॥
गेलियाही भलतेउता । उदकपणेंं पंडुसुता ।
तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवीं ॥ ११७१ ॥
तैसा मीपणें हा लोटला । तो आघवेंयाचि मजआंतु आला ।
या यात्रा होय भला । कापडी माझा ॥ ११७२ ॥
आणि शरीर स्वभाववशें । कांहीं येक करूं जरी बैसे ।
तरी मीचि तो तेणें मिषें । भेटे तया ॥ ११७३ ॥
तेथ कर्म आणि कर्ता । हें जाऊनि पंडुसुता ।
मियां आत्मेनि मज पाहतां । मीचि होय ॥ ११७४ ॥
पैं दर्पणातेंं दर्पणें । पाहिलिया होय न पाहणें ।
सोनें झांकिलिया सुवर्णें । ना झांकें जेवीं ॥ ११७५ ॥
दीपातें दीपें प्रकाशिजे । तें न प्रकाशणेंचि निपजे ।
तैसें कर्म मियां कीजे । तें करणें कैंचें ? ॥ ११७६ ॥
कर्मही करितचि आहे । जैं करावें हें भाष जाये ।
तैं न करणेंचि होये । तयाचें केलें ॥ ११७७ ॥
क्रियाजात मी जालेपणें । घडे कांहींचि न करणें ।
तयाचि नांव पूजणें । खुणेचें माझें ॥ ११७८ ॥
म्हणौनि करीतयाही वोजा । तें न करणें हेंचि कपिध्वजा ।
निफजे तिया महापूजा । पूजी तो मातें ॥ ११७९ ॥
एवं तो बोले तें स्तवन । तो देखे तें दर्शन ।
अद्वया मज गमन । तो चाले तेंचि ॥ ११८० ॥
तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा ।
तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥ ११८१ ॥
जैसें कनकेंसी कांकणें । असिजे अनन्यपणें ।
तो भक्तियोगें येणें । मजसीं तैसा ॥ ११८२ ॥
उदकीं कल्लोळु । कापुरीं परीमळु ।
रत्नीं उजाळु । अनन्यु जैसा ॥ ११८३ ॥
किंबहुना तंतूंसीं पटु । कां मृत्तिकेसीं घटु ।
तैसा तो एकवटु । मजसीं माझा ॥ ११८४ ॥
इया अनन्यसिद्धा भक्ती । या आघवाचि दृश्यजातीं ।
मज आपणपेंया सुमती । द्रष्टयातें जाण ॥ ११८५ ॥
तिन्ही अवस्थांचेनि द्वारें । उपाध्युपहिताकारें ।
भावाभावरूप स्फुरे । दृश्य जें हें ॥ ११८६ ॥
तें हें आघवेंचि मी द्रष्टा । ऐसिया बोधाचा माजिवटा ।
अनुभवाचा सुभटा । धेंडा तो नाचे ॥ ११८७ ॥
रज्जु जालिया गोचरु । आभासतां तो व्याळाकारु ।
रज्जुचि ऐसा निर्धारु । होय जेवीं ॥ ११८८ ॥
भांगारापरतें कांहीं । लेणें गुंजहीभरी नाहीं ।
हें आटुनियां ठायीं । कीजे जैसे ॥ ११८९ ॥
उदका येकापरतें । तरंग नाहींचि हें निरुतें ।
जाणोनि तया आकारातें । न घेपे जेवीं ॥ ११९० ॥
नातरी स्वप्नविकारां समस्तां । चेऊनियां उमाणें घेतां ।
तो आपणयापरौता । न दिसे जैसा ॥ ११९१ ॥
तैसें जें कांहीं आथी नाथी । येणें होय ज्ञेयस्फुर्ती ।
तें ज्ञाताचि मी हें प्रतीती । होऊनि भोगी ॥ ११९२ ॥
जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु ।
अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥ ११९३ ॥
अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु ।
आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥
ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु ।
अभय मी आधारु । आधेय मी ॥ ११९५ ॥
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु ।
सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु ।
स्थुलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥
अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु ।
व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥
अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु ।
समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥
ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।
आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥ १२०० ॥
पैं चेइलेयानंतरें । आपुलें एकपण उरे ।
तेंही तोंवरी स्फुरे । तयाशींचि जैसें ॥ १२०१ ॥
कां प्रकाशतां अर्कु । तोचि होय प्रकाशकु ।
तयाही अभेदा द्योतकु । तोचि जैसा ॥ १२०२ ॥
तैसा वेद्यांच्या विलयीं । केवळ वीदकु उरे पाहीं ।
तेणें जाणवें तया तेंही । हेंही जो जाणे ॥ १२०३ ॥
तया अद्वयपणा आपुलिया । जाणती ज्ञप्ती जे धनंजया ।
ते ईश्वरचि मी हे तया । बोधासि ये ॥ १२०४ ॥
मग द्वैताद्वैतातीत । मीचि आत्मा एकु निभ्रांत ।
हें जाणोनि जाणणें जेथ । अनुभवीं रिघे ॥ १२०५ ॥
तेथ चेइलियां येकपण । दिसे जे आपुलया आपण ।
तेंही जातां नेणों कोण । होईजे जेवीं ॥ १२०६ ॥
कां डोळां देखतिये क्षणीं । सुवर्णपण सुवर्णीं ।
नाटितां होय आटणी । अळंकाराचीही ॥ १२०७ ॥
नाना लवण तोय होये । मग क्षारता तोयत्वें राहे ।
तेही जिरतां जेवीं जाये । जालेपण तें ॥ १२०८ ॥
तैसा मी तो हें जें असे । तें स्वानंदानुभवसमरसें ।
कालवूनिया प्रवेशे । मजचिमाजीं ॥ १२०९ ॥
आणि तो हे भाष जेथ जाये । तेथे मी हें कोण्हासी आहे ।
ऐसा मी ना तो तिये सामाये । माझ्याचि रूपीं ॥ १२१० ॥
जेव्हां कापुर जळों सरे । तयाचि नाम अग्नि पुरी ।
मग उभयतातीत उरे । आकाश जेवीं ॥ १२११ ॥
का धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु ।
तैसा आहे नाहींचा शेखु । मीचि मग आथी ॥ १२१२ ॥
तेथ ब्रह्मा आत्मा ईशु । यया बोला मोडे सौरसु ।
न बोलणें याही पैसु । नाहीं तेथ ॥ १२१३ ॥
न बोलणेंही न बोलोनी । तें बोलिजे तोंड भरुनी ।
जाणिव नेणिव नेणोनी । जाणिजे तें ॥ १२१४ ॥
तेथ बुझिजे बोधु बोधें । आनंंदु घेपे आनंदें ।
सुखावरी नुसधें । सुखचि भोगिजे ॥ १२१५ ॥
तेथ लाभु जोडला लाभा । प्रभा आलिंगिली प्रभा ।
विस्मयो बुडाला उभा । विस्मयामाजीं ॥ १२१६ ॥
शमु तेथ सामावला । विश्रामु विश्रांति आला ।
अनुभवु वेडावला । अनुभूतिपणें ॥ १२१७ ॥
किंबहुना ऐसें निखळ । मीपण जोडे तया फळ ।
सेवूनि वेली वेल्हाळ । क्रमयोगाची ते ॥ १२१८ ॥
पैं क्रमयोगिया किरीटी । चक्रवर्तीच्या मुकुटीं ।
मी चिद्रत्न तें साटोवाटीं । होय तो माझा ॥ १२१९ ॥
कीं क्रमयोगप्रासादाचा । कळसु जो हा मोक्षाचा ।
तयावरील अवकाशाचा । उवावो जाला तो ॥ १२२० ॥
नाना संसार आडवीं । क्रमयोग वाट बरवी ।
जोडिली ते मदैक्यगांवीं । पैठी जालीसे ॥ १२२१ ॥
हें असो क्रमयोगबोधें । तेणें भक्तिचिद्गांगें ।
मी स्वानंदोदधी वेगें । ठाकिला कीं गा ॥ १२२२ ॥
हा ठायवरी सुवर्मा । क्रमयोगीं आहे महिमा ।
म्हणौनि वेळोवेळां तुम्हां । सांगतों आम्ही ॥ १२२३ ॥
पैं देशें काळें पदार्थें । साधूनि घेइजे मातें ।
तैसा नव्हे मी आयतें । सर्वांचें सर्वही ॥ १२२४ ॥
म्हणौनि माझ्या ठायीं । जाचावें न लगे कांहीं ।
मी लाभें इयें उपायीं । साचचि गा ॥ १२२५ ॥
एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु ।
तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया ॥ १२२६ ॥
अगा वसुधेच्या पोटीं । निधान सिद्ध किरीटी ।
वन्हि सिद्ध काष्ठीं । वोहां दूध ॥ १२२७ ॥
परी लाभे तें असतें । तया कीजे उपायातें ।
येर सिद्धचि तैसा तेथें । उपायीं मी ॥ १२२८ ॥
हा फळहीवरी उपावो । कां पां प्रस्तावीतसे देवो ।
हे पुसतां परी अभिप्रावो । येथिंचा ऐसा ॥ १२२९ ॥
जे गीतार्थाचें चांगावें । मोक्षोपायपर आघवें ।
आन शास्त्रोपाय कीं नव्हे । प्रमाणसिद्ध ॥ १२३० ॥
वारा आभाळचि फेडी । वांचूनि सूर्यातें न घडी ।
कां हातु बाबुळी धाडी । तोय न करी ॥ १२३१ ॥
तैसा आत्मदर्शनीं आडळु । असे अविद्येचा जो मळु ।
तो शास्त्र नाशी येरु निर्मळु । मी प्रकाशें स्वयें ॥ १२३२ ॥
म्हणौनि आघवींचि शास्त्रें । अविद्याविनाशाचीं पात्रें ।
वांचोनि न होतीं स्वतंत्रें । आत्मबोधीं ॥ १२३३ ॥
तया अध्यात्मशास्त्रांसीं । जैं साचपणाची ये पुसी ।
तैं येइजे जया ठायासी । ते हे गीता ॥ १२३४ ॥
भानुभूषिता प्राचिया । सतेजा दिशा आघविया ।
तैसी शास्त्रेश्वरा गीता या । सनाथें शास्त्रें ॥ १२३५ ॥
हें असो येणें शास्त्रेश्वरें । मागां उपाय बहुवे विस्तारें ।
सांगितला जैसा करें । घेवों ये आत्मा ॥ १२३६ ॥
परी प्रथमश्रवणासवें । अर्जुना विपायें हें फावे ।
हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी ॥ १२३७ ॥
तेंचि प्रमेय एक वेळ । शिष्यीं होआवया अढळ ।
सांगतसे मुकुल । मुद्रा आतां ॥ १२३८ ॥
आणि प्रसंगें गीता । ठावोही हा संपता ।
म्हणौनि दावी आद्यंता । एकार्थत्व ॥ १२३९ ॥
जे ग्रंथाच्या मध्यभागीं । नाना अधिकारप्रसंगीं ।
निरूपण अनेगीं । सिद्धांतीं केलें ॥ १२४० ॥
तरी तेतुलेही सिद्धांत । इयें शास्त्रीं प्रस्तुत ।
हे पूर्वापर नेणत । कोण्ही जैं मानी ॥ १२४१ ॥
तैं महासिद्धांताचा आवांका । सिद्धांतकक्षा अनेका ।
भिडऊनि आरंभु देखा । संपवीतु असे ॥ १२४२ ॥
एथ अविद्यानाशु हें स्थळ । तेणें मोक्षोपादान फळ ।
या दोहीं केवळ । साधन ज्ञान ॥ १२४३ ॥
हें इतुलेंचि नानापरी । निरूपिलें ग्रंथविस्तारीं ।
तें आतां दोहीं अक्षरीं । अनुवादावें ॥ १२४४ ॥
म्हणौनि उपेयही हातीं । जालया उपायस्थिती ।
देव प्रवर्तले तें पुढती । येणेंचि भावें ॥ १२४५ ॥


सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः ।
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥ ५६॥


मग म्हणे गा सुभटा । तो क्रमयोगिया निष्ठा ।
मी हौनी होय पैठा । माझ्या रूपीं ॥ १२४६ ॥
स्वकर्माच्या चोखौळीं । मज पूजा करूनि भलीं ।
तेणें प्रसादें आकळी । ज्ञाननिष्ठेतें ॥ १२४७ ॥
ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे । तेथ भक्ति माझी उल्लासे ।
तिया भजन समरसें । सुखिया होय ॥ १२४८ ॥
आणि विश्वप्रकाशितया । आत्मया मज आपुलिया ।
अनुसरे जो करूनियां । सर्वत्रता हे ॥ १२४९ ॥
सांडूनि आपुला आडळ । लवण आश्रयी जळ ।
कां हिंडोनि राहे निश्चळ । वायु व्योमीं ॥ १२५० ॥
तैसा बुद्धी वाचा कायें । जो मातें आश्रऊनि ठाये ।
तो निषिद्धेंही विपायें । कर्में करूं ॥ १२५१ ॥
परी गंगेच्या संबंधीं । बिदी आणि महानदी ।
येक तेवीं माझ्या बोधीं । शुभाशुभांसी ॥ १२५२ ॥
कां बावनें आणि धुरें । हा निवाडु तंवचि सरे ।
जंव न घेपती वैश्वानरें । कवळूनि दोन्ही ॥ १२५३ ॥
ना पांचिकें आणि सोळें । हें सोनया तंवचि आलें ।
जंव परिसु आंगमेळें । एकवटीना ॥ १२५४ ॥
तैसें शुभाशुभ ऐसें । हें तंवचिवरी आभासे ।
जंव येकु न प्रकाशे । सर्वत्र मी ॥ १२५५ ॥
अगा रात्री आणि दिवो । हा तंवचि द्वैतभावो ।
जंव न रिगिजे गांवो । गभस्तीचा ॥ १२५६ ॥
म्हणौनि माझिया भेटी । तयाचीं सर्व कर्में किरीटी ।
जाऊनि बैसे तो पाटीं । सायुज्याच्या ॥ १२५७ ॥
देशें काळें स्वभावें । वेंचु जया न संभवे ।
तें पद माझें पावे । अविनाश तो ॥ १२५८ ॥
किंबहुना पंडुसुता । मज आत्मयाची प्रसन्नता ।
लाहे तेणें न पविजतां । लाभु कवणु असे ॥ १२५९ ॥


चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः ।
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥ ५७॥


याकारणें गा तुवां इया । सर्व कर्मा आपुलिया ।
माझ्या स्वरूपीं धनंजया । संन्यासु कीजे ॥ १२६० ॥
परी तोचि संन्यासु वीरा । करणीयेचा झणें करा ।
आत्मविवेकीं धरा । चित्तवृत्ति हे ॥ १२६१ ॥
मग तेणें विवेकबळें । आपणपें कर्मावेगळें ।
माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखिजेल ॥ १२६२ ॥
आणि कर्माचि जन्मभोये । प्रकृति जे का आहे ।
ते आपणयाहूनि बहुवे । देखसी दूरी ॥ १२६३ ॥
तेथ प्रकृति आपणयां । वेगळी नुरे धनंजया ।
रूपेंवीण का छाया । जियापरी ॥ १२६४ ॥
ऐसेनि प्रकृतिनाशु । जालया कर्मसंन्यासु ।
निफजेल अनायासु । सकारणु ॥ १२६५ ॥
मग कर्मजात गेलया । मी आत्मा उरें आपणपयां ।
तेथ बुद्धि घापे करूनियां । पतिव्रता ॥ १२६६ ॥
बुद्धि अनन्य येणें योगें । मजमाजीं जैं रिगे ।
तैं चित्त चैत्यत्यागें । मातेंचि भजे ॥ १२६७ ॥
ऐसें चैत्यजातें सांडिलें । चित्त माझ्या ठायीं जडलें ।
ठाके तैसें वहिलें । सर्वदा करी ॥ १२६८ ॥


मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि ।
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनण्‌क्ष्यसि ॥ ५८॥


मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियांचि भरेल जेधवां ।
माझा प्रसादु जाण तेधवां । संपूर्ण जाहला ॥ १२६९ ॥
तेथ सकळ दुःखधामें । भुंजीजती जियें मृत्युजन्में ।
तियें दुर्गमेंचि सुगमें । होती तुज ॥ १२७० ॥
सूर्याचेनि सावायें । डोळा सावाइला होये ।
तैं अंधाराचा आहे । पाडु तया ? ॥ १२७१ ॥
तैसा माझेनि प्रसादें । जीवकणु जयाचा उपमर्दे ।
तो संसराचेनी बाधे । बागुलें केवीं ? ॥ १२७२ ॥
म्हणौनि धनंजया । तूं संसारदुर्गती यया ।
तरसील माझिया । प्रसादास्तव ॥ १२७३ ॥
अथवा हन अहंभावें । माझें बोलणें हें आघवें ।
कानामनाचिये शिंवे । नेदिसी टेंकों ॥ १२७४ ॥
तरी नित्य मुक्त अव्ययो । तूं आहासि तें होऊनि वावो ।
देहसंबंधाचा घावो । वाजेल आंगीं ॥ १२७५ ॥
जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदीं आत्मघातु ।
भुंजतां उसंतु । कहींचि नाहीं ॥ १२७६ ॥
येवढेनि दारुणें । निमणेनवीण निमणें ।
पडेल जरी बोलणें । नेघसी माझें ॥ १२७७ ॥


यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे ।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ ५९॥


पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु । कां दीपद्वेषिया अंधकारु ।
विवेकद्वेषें अहंकारु । पोषूनि तैसा ॥ १२७८ ॥
स्वदेहा नाम अर्जुनु । परदेहा नाम स्वजनु ।
संग्रामा नाम मलिनु । पापाचारु ॥ १२७९ ॥
इया मती आपुलिया । तिघां तीन नामें ययां ।
ठेऊनियां धनंजया । न झुंजें ऐसा ॥ १२८० ॥
जीवामाजीं निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु ।
तो वायां धाडील नैसर्गिकु । स्वभावोचि तुझा ॥ १२८१ ॥
आणि मी अर्जुन हे आत्मिक । ययां वधु करणें हें पातक ।
हे मायावांचूनि तात्त्विक । कांहीं आहे ? ॥ १२८२ ॥
आधीं जुंझार तुवां होआवें । मग झुंजावया शस्त्र घेयावें ।
कां न जुंझावया करावें । देवांगण ॥ १२८३ ॥
म्हणौनि न झुंजणें । म्हणसी तें वायाणें ।
ना मानूं लोकपणें । लोकदृष्टीही ॥ १२८४ ॥
तऱ्ही न झुंजें ऐसें । निष्टंकीसी जें मानसें ।
तें प्रकृति अनारिसें । करवीलचि ॥ १२८५ ॥


स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोपि तत् ॥ ६०॥


पैं पूर्वे वाहतां पाणी । पव्हिजे पश्चिमेचे वाहणीं ।
तरी आग्रहोचि उरे तें आणी । आपुलिया लेखा ॥ १२८६ ॥
कां साळीचा कणु म्हणे । मी नुगवें साळीपणें ।
तरी आहे आन करणें । स्वभावासी ? ॥ १२८७ ॥
तैसा क्षात्रंस्कारसिद्धा । प्रकृती घडिलासी प्रबुद्धा ।
आता नुठी म्हणसी हा धांदा । परी उठवीजसीचि तूं ॥ १२८८ ॥
पैं शौर्य तेज दक्षता । एवमादिक पंडुसुता ।
गुण दिधले जन्मतां । प्रकृती तुज ॥ १२८९ ॥
तरी तयाचिया समवाया\- । अनुरूप धनंजया ।
न करितां उगलियां । नयेल असों ॥ १२९० ॥
म्हणौनियां तिहीं गुणीं । बांधिलासि तूं कोदंडपाणी ।
त्रिशुद्धी निघसी वाहणीं । क्षात्राचिया ॥ १२९१ ॥
ना हें आपुलें जन्ममूळ । न विचारीतचि केवळ ।
न झुंजें ऐसें अढळ । व्रत जरी घेसी ॥ १२९२ ॥
तरी बांधोनि हात पाये । जो रथीं घातला होये ।
तो न चाले तरी जाये । दिगंता जेवीं ॥ १२९३ ॥
तैसा तूं आपुलियाकडुनी । मीं कांहींच न करीं म्हणौनि ।
ठासी परी भरंवसेनि । तूंचि करिसी ॥ १२९४ ॥
उत्तरु वैराटींचा राजा । पळतां तूं कां निघालासी झुंजा ? ।
हा क्षात्रस्वभावो तुझा । झुंजवील तुज ॥ १२९५ ॥
महावीर अकरा अक्षौहिणी । तुवां येकें नागविले रणांगणीं ।
तो स्वभावो कोदंडपाणी । झुंजवील तूंतें ॥ १२९६ ॥
हां गा रोगु कायी रोगिया । आवडे दरिद्र दरिद्रिया ? ।
परी भोगविजे बळिया । अदृष्टें जेणें ॥ १२९७ ॥
तें अदृष्ट अनारिसें । न करील ईश्वरवशें ।
तो ईश्वरुही असे । हृदयीं तुझ्या ॥ १२९८ ॥


ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१॥


सर्व भूतांच्या अंतरीं । हृदय महाअंबरीं ।
चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरीं । उदयला असे जो ॥ १२९९ ॥
अवस्थात्रय तिन्हीं लोक । प्रकाशूनि अशेख ।
अन्यथादृष्टि पांथिक । चेवविले ॥ १३०० ॥
वेद्योदकाच्या सरोवरीं । फांकतां विषयकल्हारीं ।
इंद्रियषट्पदा चारी । जीवभ्रमरातें ॥ १३०१ ॥
असो रूपक हें तो ईश्वरु । सकल भूतांचा अहंकारु ।
पांघरोनि निरंतरु । उल्हासत असे ॥ १३०२ ॥
स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र ।
बाहेरी नटी छायाचित्र । चौर्याशीं लक्ष ॥ १३०३ ॥
तया ब्रह्मादिकीटांता । अशेषांही भूतजातां ।
देहाकार योग्यता । पाहोनि दावी ॥ १३०४ ॥
तेथ जें देह जयापुढें । अनुरूपपणें मांडे ।
तें भूत तया आरूढे । हें मी म्हणौनि ॥ १३०५ ॥
सूत सूतें गुंतलें । तृण तृणचि बांधलें ।
कां आत्मबिंबा घेतलें । बाळकें जळीं ॥ १३०६ ॥
तयापरी देहाकारें । आपणपेंचि दुसरें ।
देखोनि जीव आविष्करें । आत्मबुद्धि ॥ १३०७ ॥
ऐसेनि शरीराकारीं । यंत्रीं भूतें अवधारीं ।
वाहूनि हालवी दोरी । प्राचीनाची ॥ १३०८ ॥
तेथ जया जें कर्मसूत्र । मांडूनि ठेविलें स्वतंत्र ।
तें तिये गती पात्र । होंचि लागे ॥ १३०९ ॥
किंबहुना धनुर्धरा । भूतांतें स्वर्गसंसारा ।
\-माजीं भोवंडी तृणें वारा । आकाशीं जैसा ॥ १३१० ॥
भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे ।
तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें ॥ १३११ ॥
जैसे चेष्टा आपुलिया । समुद्रादिक धनंजया ।
चेष्टती चंद्राचिया । सन्निधी येकीं ॥ १३१२ ॥
तया सिंधू भरितें दाटें । सोमकांता पाझरु फुटे ।
कुमुदांचकोरांचा फिटे । संकोचु तो ॥ १३१३ ॥
तैसीं बीजप्रकृतिवशें । अनेकें भूतें येकें ईशें ।
चेष्टवीजती तो असे । तुझ्या हृदयीं ॥ १३१४ ॥
अर्जुनपण न घेतां । मी ऐसें जें पंडुसुता ।
उठतसे तें तत्वता । तयाचें रूप ॥ १३१५ ॥
यालागीं तो प्रकृतीतें । प्रवर्तवील हें निरुतें ।
आणि तें झुंजवील तूंतें । न झुंजशी जऱ्ही ॥ १३१६ ॥
म्हणौनि ईश्वर गोसावी । तेणें प्रकृती हे नेमावी ।
तिया सुखें राबवावीं । इंद्रियें आपुलीं ॥ १३१७ ॥
तूं करणें न करणें दोन्हीं । लाऊनि प्रकृतीच्या मानीं ।
प्रकृतीही कां अधीनी । हृदयस्था जया ॥ १३१८ ॥


तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।
तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥ ६२॥


तया अहं वाचा चित्त आंग । देऊनिया शरण रिग ।
महोदधी कां गांग । रिगालें जैसें ॥ १३१९ ॥
मग तयाचेनि प्रसादें । सर्वोपशांतिप्रमदे ।
कांतु होऊनिया स्वानंदें । स्वरूपींचि रमसी ॥ १३२० ॥
संभूति जेणें संभवे । विश्रांति जेथें विसंवे ।
अनुभूतिही अनुभवे । अनुभवा जया ॥ १३२१ ॥
तिये निजात्मपदींचा रावो । होऊनि ठाकसी अव्यवो ।
म्हणे लक्ष्मीनाहो । पार्था तूं गा ॥ १३२२ ॥


इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ ६३॥


हें गीता नाम विख्यात । सर्ववाङ्गमयाचें मथित ।
आत्मा जेणें हस्तगत । रत्न होय ॥ १३२३ ॥
ज्ञान ऐसिया रूढी । वेदांतीं जयाची प्रौढी ।
वानितां कीर्ति चोखडी । पातली जगीं ॥ १३२४ ॥
बुद्ध्यादिकें डोळसें । हें जयाचें कां कडवसें ।
मी सर्वद्रष्टाही दिसें । पाहला जया ॥ १३२५ ॥
तें हें गा आत्मज्ञान । मज गोप्याचेंही गुप्त धन ।
परी तूं म्हणौनि आन । केवीं करूं ? ॥ १३२६ ॥
याकारणें गा पांडवा । आम्हीं आपुला हा गुह्य ठेवा ।
तुज दिधला कणवा । जाकळिलेपणें ॥ १३२७ ॥
जैसी भुलली वोरसें । माय बोले बाळा दोषें ।
प्रीति ही परी तैसें । न करूंचि हो ॥ १३२८ ॥
येथ आकाश आणि गाळिजे । अमृताही साली फेडिजे ।
कां दिव्याकरवीं करविजे । दिव्य जैसे ॥ १३२९ ॥
जयाचेनि अंगप्रकाशें । पाताळींचा परमाणु दिसे ।
तया सूर्याहि का जैसे । अंजन सूदलें ॥ १३३० ॥
तैसें सर्वज्ञेंही मियां । सर्वही निर्धारूनियां ।
निकें होय तें धनंजया । सांगितलें तुज ॥ १३३१ ॥
आतां तूं ययावरी । निकें हें निर्धारीं ।
निर्धारूनि करीं । आवडे तैसें ॥ १३३२ ॥
यया देवाचिया बोला । अर्जुनु उगाचि ठेला ।
तेथ देवो म्हणती भला । अवंचकु होसी ॥ १३३३ ॥
वाढतयापुढें भुकेला । उपरोधें म्हणे मी धाला ।
तैं तोचि पीडे आपुला । आणि दोषुही तया ॥ १३३४ ॥
तैसा सर्वज्ञु श्रीगुरु । भेटलिया आत्मनिर्धारु ।
न पुसिजे जैं आभारु । धरूनियां ॥ १३३५ ॥
तैं आपणपेंचि वंचे । आणि पापही वंचनाचें ।
आपणयाचि साचें । चुकविलें तेणें ॥ १३३६ ॥
पैं उगेपणा तुझिया । हा अभिप्रावो कीं धनंजया ।
जें एकवेळ आवांकुनियां । सांगावें ज्ञान ॥ १३३७ ॥
तेथ पार्थु म्हणे दातारा । भलें जाणसी माझिया अंतरा ।
हें म्हणों तरी दुसरा । जाणता असे काई ? ॥ १३३८ ॥
येर ज्ञेय हें जी आघवें । तूं ज्ञाता एकचि स्वभावें ।
मा सूर्यु म्हणौनि वानावें । सूर्यातें काई ? ॥ १३३९ ॥
या बोला श्रीकृष्णें । म्हणितलें काय येणें ।
हेंचि थोडें गा वानणें । जें बुझतासि तूं ॥ १३४० ॥


सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः ।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥ ६४॥


तरी अवधान पघळ । करूनियाम् आणिक येक वेळ ।
वाक्य माझें निर्मळ । अवधारीं पां ॥ १३४१ ॥
हें वाच्य म्हणौनि बोलिजे । कां श्राव्य मग आयिकिजे ।
तैसें नव्हें परी तुझें । भाग्य बरवें ॥ १३४२ ॥
कूर्मीचिया पिलियां । दिठी पान्हा ये धनंजया ।
कां आकाश वाहे बापिया । घरींचें पाणी ॥ १३४३ ॥
जो व्यवहारु जेथ न घडे । तयाचें फळचि तेथ जोडे ।
काय दैवें न सांपडे । सानुकूळें ? ॥ १३४४ ॥
येऱ्हवीं द्वैताची वारी । सारूनि ऐक्याच्या परीवरीं ।
भोगिजे तें अवधारीं । रहस्य हें ॥ १३४५ ॥
आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जें प्रियोत्तमा ।
तें दुजें नव्हे कीं आत्मा । ऐसेंचि जाणावें ॥ १३४६ ॥
आरिसाचिया देखिलया । गोमटें कीजे धनंजया ।
तें तया नोहे आपणयां । लागीं जैसें ॥ १३४७ ॥
तैसें पार्था तुझेनि मिषें । मी बोलें आपणयाचि उद्देशें ।
माझ्या तुझ्या ठाईं असे । मीतूंपण गा ॥ १३४८ ॥
म्हणौनि जिव्हारींचें गुज । सांगतसे जीवासी तुज ।
हें अनन्यगतीचें मज । आथी व्यसन ॥ १३४९ ॥
पैम् जळा आपणपें देतां । लवण भुललें पंडुसुता ।
कीं आघवें तयाचें होतां । न लजेचि तें ॥ १३५० ॥
तैसा तूं माझ्या ठाईं । राखों नेणसीचि कांहीं ।
तरी आतां तुज काई । गोप्य मी करूं ? ॥ १३५१ ॥
म्हणौनि आघवींचि गूढें । जें पाऊनि अति उघडें ।
तें गोप्य माझें चोखडें । वाक्य आइक ॥ १३५२ ॥


मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ ६५॥


तरी बाह्य आणि अंतरा । आपुलिया सर्व व्यापारा ।
मज व्यापकातें वीरा । विषयो करीं ॥ १३५३ ॥
आघवा आंगीं जैसा । वायु मिळोनि आहे आकाशा ।
तूं सर्व कर्मीं तैसा । मजसींचि आस ॥ १३५४ ॥
किंबहुना आपुलें मन । करीं माझें एकायतन ।
माझेनि श्रवणें कान । भरूनि घालीं ॥ १३५५ ॥
आत्मज्ञानें चोखडीं । संत जे माझीं रूपडीं ।
तेथ दृष्टि पडो आवडी । कामिनी जैसी ॥ १३५६ ॥
मीं सर्व वस्तीचें वसौटें । माझीं नामें जियें चोखटें ।
तियें जियावया वाटे । वाचेचिये लावीं ॥ १३५७ ॥
हातांचें करणें । कां पायांचें चालणें ।
तें होय मजकारणें । तैसें करीं ॥ १३५८ ॥
आपुला अथवा परावा । ठायीं उपकरसी पांडवा ।
तेणें यज्ञें होईं बरवा । याज्ञिकु माझा ॥ १३५९ ॥
हें एकैक शिकऊं काई । पैं सेवकें आपुल्या ठाईं ।
उरूनि येर सर्वही । मी सेव्यचि करीं ॥ १३६० ॥
तेथ जाऊनिया भूतद्वेषु । सर्वत्र नमवैन मीचि एकु ।
ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु । लाहसी तूं माझा ॥ १३६१ ॥
मग भरलेया जगाआंतु । जाऊनि तिजयाची मातु ।
होऊनि ठायील एकांतु । आम्हां तुम्हां ॥ १३६२ ॥
तेव्हां भलतिये आवस्थे । मी तूतें तूं मातें ।
भोगिसी ऐसें आइतें । वाढेल सुख ॥ १३६३ ॥
आणि तिजें आडळ करितें । निमालें अर्जुना जेथें ।
तें मीचि म्हणौनि तूं मातें । पावसी शेखीं ॥ १३६४ ॥
जैसी जळींची प्रतिभा । जळनाशीं बिंबा ।
येतां गाभागोभा । कांहीं आहे ? ॥ १३६५ ॥
पैं पवनु अंबरा । कां कल्लोळु सागरा ।
मिळतां आडवारा । कोणाचा गा ? ॥ १३६६ ॥
म्हणौनि तूं आणि आम्हीं । हें दिसताहे देहधर्मीं ।
मग ययाच्या विरामीं । मीचि होसी ॥ १३६७ ॥
यया बोलामाझारीं । होय नव्हे झणें करीं ।
येथ आन आथी तरी । तुझीचि आण ॥ १३६८ ॥
पैं तुझी आण वाहणें । हें आत्मलिंगातें शिवणें ।
प्रीतीची जाति लाजणें । आठवों नेदी ॥ १३६९ ॥
येऱ्हवीं वेद्यु निष्प्रपंचु । जेणें विश्वाभासु हा साचु ।
आज्ञेचा नटनाचु । काळातें जिणें ॥ १३७० ॥
तो देवो मी सत्यसंकल्पु । आणि जगाच्या हितीं बापु ।
मा आणेचा आक्षेपु । कां करावा ? ॥ १३७१ ॥
परी अर्जुना तुझेनि वेधें । मियां देवपणाचीं बिरुदें ।
सांडिलीं गा मी हे आधें । सगळेनि तुवां ॥ १३७२ ॥
पैं काजा आपुलिया । रावो आपुली आपणया ।
आण वाहे धनंजया । तैसें हें कीं ॥ १३७३ ॥
तेथ अर्जुनु म्हणे देवें । अचाट हें न बोलावें ।
जे आमचें काज नांवें । तुझेनि एके ॥ १३७४ ॥
यावरी सांगों बैससी । कां सांगतां भाषही देसी ।
या तुझिया विनोदासी । पारु आहे जी ? ॥ १३७५ ॥
कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु ।
तेथ आघवाचि प्रकाशु । नित्य दे तो ॥ १३७६ ॥
पृथ्वी निवऊनि सागर । भरीजती येवढें थोर ।
वर्षे तेथ मिषांतर । चातकु कीं ॥ १३७७ ॥
म्हणौनि औदार्या तुझेया । मज निमित्त ना म्हणावया ।
प्राप्ति असे दानीराया । कृपानिधी ॥ १३७८ ॥
तंव देवो म्हणती राहें । या बोलाचा प्रस्तावो नोहे ।
पैं मातें पावसी उपायें । साचचि येणें ॥ १३७९ ॥
सैंधव सिंधू पडलिया । जो क्षणु धनंजया ।
तेणें विरेचि कीं उरावया । कारण कायी ? ॥ १३८० ॥
तैसें सर्वत्र मातें भजतां । सर्व मी होतां अहंता ।
निःशेष जाऊनि तत्वता । मीचि होसी ॥ १३८१ ॥
एवं माझिये प्राप्तीवरी । कर्मालागोनि अवधारीं ।
दाविली तुज उजरी । उपायांची ॥ १३८२ ॥
जे आधीं तंव पंडुसुता । सर्व कर्में मज अर्पितां ।
सर्वत्र प्रसन्नता । लाहिजे माझी ॥ १३८३ ॥
पाठीं माझ्या इये प्रसादीं । माझें ज्ञान जाय सिद्धी ।
तेणें मिसळिजे त्रिशुद्धी । स्वरूपीं माझ्या ॥ १३८४ ॥
मग पार्था तिये ठायीं । साध्य साधन होय नाहीं ।
किंबहुना तुज कांहीं । उरेचि ना ॥ १३८५ ॥
तरी सर्व कर्में आपलीं । तुवां सर्वदा मज अर्पिलीं ।
तेणें प्रसन्नता लाधली । आजि हे माझी ॥ १३८६ ॥
म्हणौनि येणें प्रसादबळें । नव्हे झुंजाचेनि आडळें ।
न ठाकेचि येकवेळे । भाळलों तुज ॥ १३८७ ॥
जेणें सप्रपंच अज्ञान जाये । एकु मी गोचरु होये ।
तें उपपत्तीचेनि उपायें । गीतारूप हें ॥ १३८८ ॥
मियां ज्ञान तुज आपुलें । नानापरी उपदेशिलें ।
येणें अज्ञानजात सांडी वियालें । धर्माधर्म जें ॥ १३८९ ॥


सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ ६६॥


आशा जैसी दुःखातें । व्यालीं निंदा दुरितें ।
हे असो जैसें दैन्यातें । दुर्भगत्व ॥ १३९० ॥
तैसें स्वर्गनरकसूचक । अज्ञान व्यालें धर्मादिक ।
तें सांडूनि घालीं अशेख । ज्ञानें येणें ॥ १३९१ ॥
हातीं घेऊन तो दोरु । सांडिजे जैसा सर्पाकारु ।
कां निद्रात्यागें घराचारु । स्वप्नींचा जैसा ॥ १३९२ ॥
नाना सांडिलेनि कवळें । चंद्रींचें धुये पिंवळें ।
व्याधित्यागें कडुवाळें\- । पण मुखाचें ॥ १३९३ ॥
अगा दिवसा पाठीं देउनी । मृगजळ घापे त्यजुनी ।
कां काष्ठत्यागें वन्ही । त्यजिजे जैसा ॥ १३९४ ॥
तैसें धर्माधर्माचें टवाळ । दावी अज्ञान जें कां मूळ ।
तें त्यजूनि त्यजीं सकळ । धर्मजात ॥ १३९५ ॥
मग अज्ञान निमालिया । मीचि येकु असे अपैसया ।
सनिद्र स्वप्न गेलया । आपणपें जैसें ॥ १३९६ ॥
तैसा मी एकवांचूनि कांहीं । मग भिन्नाभिन्न आन नाहीं ।
सोऽहंबोधें तयाच्या ठायीं । अनन्यु होय ॥ १३९७ ॥
पैंं आपुलेनि भेदेंविण । माझें जाणिजे जें एकपण ।
तयाचि नांव शरण । मज यीणें गा ॥ १३९८ ॥
जैसें घटाचेनि नाशें । गगनीं गगन प्रवेशे ।
मज शरण येणें तैसें । ऐक्य करी ॥ १३९९ ॥
सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया ।
तैसा मज धनंजया । शरण ये तूं ॥ १४०० ॥
वांचूनि सागराच्या पोटीं । वडवानळु शरण आला किरीटी ।
जाळूनि ठाके तया गोठी । वाळूनि दे पां ॥ १४०१ ॥
मजही शरण रिघिजे । आणि जीवत्वेंचि असिजे ।
धिग् बोली यिया न लजे । प्रज्ञा केवीं ॥ १४०२ ॥
अगा प्राकृताही राया । आंगीं पडे जें धनंजया ।
तें दासिरूंहि कीं तया । समान होय ॥ १४०३ ॥
मा मी विश्वेश्वरु भेटे । आणि जीवग्रंथी न सुटे ।
हे बोल नको वोखटें । कानीं लाऊं ॥ १४०४ ॥
म्हणौनि मी होऊनि मातें । सेवणें आहे आयितें ।
तें करीं हातां येतें । ज्ञानें येणें ॥ १४०५ ॥
मग ताकौनियां काढिलें । लोणी मागौतें ताकीं घातलें ।
परी न घेपेचि कांहींं केलें । तेणें जेवीं ॥ १४०६ ॥
तैसें अद्वयत्वें मज । शरण रिघालिया तुज ।
धर्माधर्म हे सहज । लागतील ना ॥ १४०७ ॥
लोह उभें खाय माती । तें परीसाचिये संगतीं ।
सोनें जालया पुढती । न शिविजे मळें ॥ १४०८ ॥
हें असो काष्ठापासोनि । मथूनि घेतलिया वन्ही ।
मग काष्ठेंही कोंडोनी । न ठके जैसा ॥ १४०९ ॥
अर्जुना काय दिनकरु । देखत आहे अंधारु ।
कीं प्रबोधीं होय गोचरु । स्वप्नभ्रमु । ॥ १४१० ॥
तैसें मजसी येकवटलेया । मी सर्वरूप वांचूनियां ।
आन कांहीं उरावया । कारण असे ? ॥ १४११ ॥
म्हणौनि तयाचें कांहीं । चिंतीं न आपुल्या ठायीं ।
तुझें पापपुण्य पाहीं । मीचि होईन ॥ १४१२ ॥
तेथ सर्वबंधलक्षणें । पापें उरावें दुजेपणें ।
तें माझ्या बोधीं वायाणें । होऊनि जाईल ॥ १४१३ ॥
जळीं पडिलिया लवणा । सर्वही जळ होईल विचक्षणा ।
तुज मी अनन्यशरणा । होईन तैसा ॥ १४१४ ॥
येतुलेनि आपैसया । सुटलाचि आहसी धनंजया ।
घेईं मज प्रकाशोनियां । सोडवीन तूंतें ॥ १४१५ ॥
याकारणें पुढती । हे आधी न वाहे चित्तीं ।
मज एकासि ये सुमती । जाणोनि शरण ॥ १४१६ ॥
ऐसें सर्वरूपरूपसें । सर्वदृष्टिडोळसें ।
सर्वदेशनिवासें । बोलिलें श्रीकृष्णें ॥ १४१७ ॥
मग सांवळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु ।
आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो ॥ १४१८ ॥
न पवतां जयातें । काखे सूनि बुद्धीतें ।
बोंलणें मागौतें । वोसरलें ॥ १४१९ ॥
ऐसें जें कांहीं येक । बोला बुद्धीसिही अटक ।
तें द्यावया मिष । खेवाचें केलें ॥ १४२० ॥
हृदया हृदय येक जाले । ये हृदयींचें ते हृदयीं घातलें ।
द्वैत न मोडितां केलें । आपणा{ऐ}सें अर्जुना ॥ १४२१ ॥
दीपें दीप लाविला । तैसा परीष्वंगु तो जाला ।
द्वैत न मोडितां केला । आपणपें पार्थुं ॥ १४२२ ॥
तेव्हां सुखाचा मग तया । पूरु आला जो धनंजया ।
तेथ वाडु तऱ्हीं बुडोनियां ॥ ठेला देवो ॥ १४२३॥
सिंधु सिंधूतें पावों जाये । तें पावणें ठाके दुणा होये ।
वरी रिगे पुरवणिये । आकाशही ॥ १४२४ ॥
तैसें तयां दोघांचें मिळणें । दोघां नावरे जाणावें कवणें ।
किंबहुना श्रीनारायणें । विश्व कोंदलें ॥ १४२५ ॥
एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र ।
श्रीकृष्णें गीताशास्त्र । प्रकट केलें ॥ १४२६ ॥
येथ गीता मूळ वेदां । ऐसें केवीं पां आलें बोधा ।
हें म्हणाल तरी प्रसिद्धा । उपपत्ति सांगों ॥ १४२७ ॥
तरी जयाच्या निःश्वासीं । जन्म झाले वेदराशी ।
तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं । बोलला स्वमुखें ॥ १४२८ ॥
म्हणौनि वेदां मूळभूत । गीता म्हणों हें होय उचित ।
आणिकही येकी येथ । उपपत्ति असे ॥ १४२९ ॥
जें न नशतु स्वरूपें । जयाचा विस्तारु जेथ लपे ।
तें तयांचें म्हणिपे । बीज जगीं ॥ १४३० ॥
तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु ।
गीतेमाजीं असे रुखु । बीजीं जैसा ॥ १४३१ ॥
म्हणौनि वेदांचें बीज । श्रीगीता होय हें मज ।
गमे आणि सहज । दिसतही आहे ॥ १४३२ ॥
जे वेदांचे तिन्ही भाग । गीते उमटले असती चांग ।
भूषणरत्नीं सर्वांग । शोभलें जैसें ॥ १४३३ ॥
तियेचि कर्मादिकें तिन्ही । कांडें कोणकोणे स्थानीं ।
गीते आहाति तें नयनीं । दाखऊं आईक ॥ १४३४ ॥
तरी पहिला जो अध्यावो । तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्तावो ।
द्वितीयीं साङ्ख्यसद्भावो । प्रकाशिला ॥ १४३५ ॥
मोक्षदानीं स्वतंत्र । ज्ञानप्रधान हें शास्त्र ।
येतुलालें दुजीं सूत्र । उभारिलें ॥ १४३६ ॥
मग अज्ञानें बांधलेयां । मोक्षपदीं बैसावया ।
साधनारंभु तो तृतीया\- । ध्यायीं बोलिला ॥ १४३७ ॥
जे देहाभिमान बंधें । सांडूनि काम्यनिषिद्धें ।
विहित परी अप्रमादें । अनुष्ठावें ॥ १४३८ ॥
ऐसेनि सद्भावें कर्म करावें । हा तिजा अध्यावो जो देवें ।
निर्णय केला तें जाणावें । कर्मकांड येथ ॥ १४३९ ॥
आणि तेंचि नित्यादिक । अज्ञानाचें आवश्यक ।
आचरतां मोंचक । केवीं होय पां ॥ १४४० ॥
ऐसी अपेक्षा जालिया । बद्ध मुमुक्षुते आलिया ।
देवें ब्रह्मार्पणत्वें क्रिया । सांगितली ॥ १४४१ ॥
जे देहवाचामानसें । विहित निपजे जें जैसें ।
तें एक ईश्वरोद्देशें । कीजे म्हणितलें ॥ १४४२ ॥
हेंचि ईश्वरीं कर्मयोगें । भजनकथनाचें खागें ।
आदरिलें शेषभागें । चतुर्थाचेनी ॥ १४४३ ॥
तें विश्वरूप अकरावा । अध्यावो संपे जंव आघवा ।
तंव कर्में ईशु भजावा । हें जें बोलिलें ॥ १४४४ ॥
तें अष्टाध्यायीं उघड । जाण येथें देवताकांड ।
शास्त्र सांगतसे आड । मोडूनि बोलें ॥ १४४५ ॥
आणि तेणेंचि ईशप्रसादें । श्रीगुरुसंप्रदायलब्धें ।
साच ज्ञान उद्बोधे । कोंवळें जें ॥ १४४६ ॥
तें अद्वेष्टादिप्रभृतिकीं । अथवा अमानित्वादिकीं ।
वाढविजे म्हणौनि लेखी । बारावा गणूं ॥ १४४७ ॥
तो बारावा अध्याय आदी । आणि पंधरावा अवधी ।
ज्ञानफळपाकसिद्धी । निरूपणासीं ॥ १४४८ ॥
म्हणौनि चहूंही इहीं । ऊर्ध्वमूळांतीं अध्यायीं ।
ज्ञानकांड ये ठायीं । निरूपिजे ॥ १४४९ ॥
एवं कांडत्रयनिरूपणी । श्रुतीचि हे कोडिसवाणी ।
गीतापद्यरत्नांचीं लेणीं । लेयिली आहे ॥ १४५० ॥
हें असो कांडत्रयात्मक । श्रुति मोक्षरूप फळ येक ।
बोभावे जें आवश्यक । ठाकावें म्हणौनि ॥ १४५१ ॥
तयाचेनि साधन ज्ञानेंसीं । वैर करी जो प्रतिदिवशीं ।
तो अज्ञानवर्ग षोडशीं । प्रतिपादिजे ॥ १४५२ ॥
तोचि शास्त्राचा बोळावा । घेवोनि वैरी जिणावा ।
हा निरोपु तो सतरावा । अध्याय येथ ॥ १४५३ ॥
ऐसा प्रथमालागोनि । सतरावा लाणी करूनी ।
आत्मनिश्वास विवरूनी । दाविला देवें ॥ १४५४ ॥
तया अर्थजातां अशेषां । केला तात्पर्याचा आवांका ।
तो हा अठरावा देखा । कलशाध्यायो ॥ १४५५ ॥
एवं सकळसंख्यासिद्धु । श्रीभागवद्गीता प्रबंधु ।
हा औदार्यें आगळा वेदु । मूर्तु जाण ॥ १४५६ ॥
वेदु संपन्नु होय ठाईं । परी कृपणु ऐसा आनु नाहीं ।
जे कानीं लागला तिहीं । वर्णांच्याचि ॥ १४५७ ॥
येरां भवव्याथा ठेलियां । स्त्रीशूद्रादिकां प्राणियां ।
अनवसरू मांडूनियां । राहिला आहे ॥ १४५८ ॥
तरी मज पाहतां तें मागील उणें । फेडावया गीतापणें ।
वेदु वेठला भलतेणें । सेव्य होआवया ॥ १४५९ ॥
ना हे अर्थु रिगोनि मनीं । श्रवणें लागोनि कानीं ।
जपमिषें वदनीं । वसोनियां ॥ १४६० ॥
ये गीतेचा पाठु जो जाणे । तयाचेनि सांगातीपणें ।
गीता लिहोनि वाहाणें । पुस्तकमिषें ॥ १४६१ ॥
ऐसैसा मिसकटां । संसाराचा चोहटा ।
गवादी घालीत चोखटा । मोक्षसुखाची ॥ १४६२ ॥
परी आकाशीं वसावया । पृथ्वीवरी बैसावया ।
रविदीप्ति राहाटावया । आवारु नभ ॥ १४६३ ॥
तेवीं उत्तम अधम ऐसें । सेवितां कवणातेंही न पुसे ।
कैवल्यदानें सरिसें । निववीत जगा ॥ १४६४ ॥
यालागीं मागिली कुटी । भ्याला वेदु गीतेच्या पोटीं ।
रिगाला आतां गोमटी । कीर्ति पातला ॥ १४६५ ॥
म्हणौनि वेदाची सुसेव्यता । ते हे मूर्त जाण श्रीगीता ।
श्रीकृष्णें पंडुसुता । उपदेशिली ॥ १४६६ ॥
परी वत्साचेनि वोरसें । दुभतें होय घरोद्देशें ।
जालें पांडवाचेनि मिषें । जगदुद्धरण ॥ १४६७ ॥
चातकाचियें कणवें । मेघु पाणियेसिं धांवे ।
तेथ चराचर आघवें । निवालें जेवीं ॥ १४६८ ॥
कां अनन्यगतिकमळा\- । लागीं सूर्य ये वेळोवेळां ।
कीं सुखिया होईजे डोळां । त्रिभुवनींचा ॥ १४६९ ॥
तैसें अर्जुनाचेनि व्याजें । गीता प्रकाशूनि श्रीराजें ।
संसारायेवढें थोर ओझें । फेडिलें जगाचें ॥ १४७० ॥
सर्वशास्त्ररत्नदीप्ती । उजळिता हा त्रिजगतीं ।
सूर्यु नव्हें लक्ष्मीपती । वक्त्राकाशींचा ॥ १४७१ ॥
बाप कुळ तें पवित्र । जेथिंचा पार्थु या ज्ञाना पात्र ।
जेणें गीता केलें शास्त्र । आवारु जगा ॥ १४७२ ॥
हें असो मग तेणें । सद्गुरु श्रीकृष्णें ।
पार्थाचें मिसळणें । आणिलें द्वैता ॥ १४७३ ॥
पाठीं म्हणतसे पांडवा । शास्त्र हें मानलें कीं जीवा ।
तेथ येरु म्हणे देवा । आपुलिया कृपा ॥ १४७४ ॥
तरी निधान जोडावया । भाग्य घडे गा धनंजया ।
परी जोडिलें भोगावया । विपायें होय ॥ १४७५ ॥
पैं क्षीरसागरायेवढें । अविरजी दुधाचें भांडें ।
सुरां असुरां केवढें । मथितां जालें ॥ १४७६ ॥
तें सायासही फळा आलें । जें अमृतही डोळां देखिलें ।
परी वरिचिली चुकलें । जतनेतें ॥ १४७७ ॥
तेथ अमरत्वा वोगरिलें । तें मरणाचिलागीं जालें ।
भोगों नेणतां जोडलें । ऐसें आहे ॥ १४७८ ॥
नहुषु स्वर्गाधिपति जाहला । परी राहाटीं भांबावला ।
तो भुजंगत्व पावला । नेणसी कायी ? ॥ १४७९ ॥
म्हणौनि बहुत पुण्य तुवां । केलें तेणें धनंजया ।
आजि शास्त्रराजा इया । जालासि विषयो ॥ १४८० ॥
तरी ययाचि शास्त्राचेनि । संप्रदायें पांघुरौनि ।
शास्त्रार्थ हा निकेनि । अनुष्ठीं हो ॥ १४८१ ॥
येऱ्हवीं अमृतमंथना\- । सारिखें होईल अर्जुना ।
जरी रिघसी अनुष्ठाना । संप्रदायेंवीण ॥ १४८२ ॥
गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी ।
जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची ॥ १४८३ ॥
तैसा श्रीगुरु प्रसन्न होये । शिष्य विद्याही कीर लाहे ।
परी ते फळे संप्रदायें । उपासिलिया ॥ १४८४ ॥
म्हणौनि शास्त्रीं जो इये । उचितु संप्रदायो आहे ।
तो ऐक आतां बहुवें । आदरेंसीं ॥ १४८५ ॥


इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन ।
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ ६७॥


तरी तुवां हें जें पार्था । गीताशास्त्र लाधलें आस्था ।
तें तपोहीना सर्वथा । सांगावें ना हो ॥ १४८६ ॥
अथवा तापसुही जाला । परी गुरूभक्तीं जो ढिला ।
तो वेदीं अंत्यजु वाळिळा । तैसा वाळीं ॥ १४८७ ॥
नातरी पुरोडाशु जैसा । न घापे वृद्ध तरी वायसा ।
गीता नेदी तैसी तापसा । गुरुभक्तिहीना ॥ १४८८ ॥
कां तपही जोडे देहीं । भजे गुरुदेवांच्या ठायीं ।
परी आकर्णनीं नाहीं । चाड जरी ॥ १४८९ ॥
तरी मागील दोन्हीं आंगीं । उत्तम होय कीर जगीं ।
परी या श्रवणालागीं । योग्यु नोहे ॥ १४९० ॥
मुक्ताफळ भलतैसें । हो परी मुख नसे ।
तंव गुण प्रवेशे । तेथ कायी ? ॥ १४९१ ॥
सागरु गंभीरु होये । हें कोण ना म्हणत आहे ।
परी वृष्टि वायां जाये । जाली तेथ ॥ १४९२ ॥
धालिया दिव्यान्न सुवावें । मग जें वायां धाडावें ।
तें आर्तीं कां न करावें । उदारपण ॥ १४९३ ॥
म्हणौनि योग्य भलतैसें । होतु परी चाड नसे ।
तरी झणें वानिवसें । देसी हें तयां ॥ १४९४ ॥
रूपाचा सुजाणु डोळा । वोढवूं ये कायि परिमळा ? ।
जेथ जें माने ते फळा । तेथचि ते गा ॥ १४९५ ॥
म्हणौनि तपी भक्ति । पाहावे ते सुभद्रापती ।
परी शास्त्रश्रवणीं अनासक्ती । वाळावेचि ते ॥ १४९६ ॥
नातरी तपभक्ति । होऊनि श्रवणीं आर्ति ।
आथी ऐसीही आयती । देखसी जरी ॥ १४९७ ॥
तरी गीताशास्त्रनिर्मिता । जो मी सकळलोकशास्ता ।
तया मातें सामान्यता । बोलेल जो ॥ १४९८ ॥
माझ्या सज्जनेंसिं मातें । पैशुन्याचेनि हातें ।
येक आहाती तयांतें । योग्य न म्हण ॥ १४९९ ॥
तयांची येर आघवी । सामग्री ऐसी जाणावी ।
दीपेंवीण ठाणदिवी । रात्रीची जैसी ॥ १५०० ॥
अंग गोरें आणि तरुणें । वरी लेईलें आहे लेणें ।
परी येकलेनि प्राणें । सांडिलें जेवीं ॥ १५०१ ॥
सोनयाचें सुंदर । निर्वाळिलें होय घर ।
परी सर्पांगना द्वार । रुंधलें आहे ॥ १५०२ ॥
निपजे दिव्यान्न चोखट । परी माजीं काळकूट ।
असो मैत्री कपट\- । गर्भिणी जैसी ॥ १५०३ ॥
तैसी तपभक्तिमेधा । तयाची जाण प्रबुद्धा ।
जो माझयांची कां निंदा । माझीचि करी ॥ १५०४ ॥
याकारणें धनंजया । तो भक्तु मेधावीं तपिया ।
तरी नको बापा इया । शास्त्रा आतळों देवों ॥ १५०५ ॥
काय बहु बोलों निंदका । योग्य स्रष्टयाहीसारिखा ।
गीता हे कवतिका\- । लागींही नेदीं ॥ १५०६ ॥
म्हणौनि तपाचा धनुर्धरा । तळीं दाटोनि गाडोरा ।
वरी गुरुभक्तीचा पुरा । प्रासादु जो जाला ॥ १५०७ ॥
आणि श्रवणेच्छेचा पुढां । दारवंटा सदा उघडा ।
वरी कलशु चोखडा । अनिंदारत्नांचा ॥ १५०८ ॥


य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति ।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ ६८॥


ऐशा भक्तालयीं चोखटीं । गीतारत्नेश्वरु हा प्रतिष्ठीं ।
मग माझिया संवसाटी । तुकसी जगीं ॥ १५०९ ॥
कां जे एकाक्षरपणेंसीं । त्रिमात्रकेचिये कुशीं ।
प्रणवु होतां गर्भवासीं । सांकडला ॥ १५१० ॥
तो गीतेचिया बाहाळींं । वेदबीज गेलें पाहाळी.ण् ।
कीं गायत्री फुलींफळीं । श्लोकांच्या आली ॥ १५११ ॥
ते हे मंत्ररहय गीता । मेळवी जो माझिया भक्ता ।
अनन्यजीवना माता । बाळका जैसी ॥ १५१२ ॥
तैसी भक्तां गीतेसीं । भेटी करी जो आदरेंसीं ।
तो देहापाठीं मजसीं । येकचि होय ॥ १५१३ ॥


न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः ।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ ६९॥


आणि देहाचेंही लेणें । लेऊनि वेगळेपणें ।
असे तंव जीवेंप्राणें । तोचि पढिये ॥ १५१४ ॥
ज्ञानियां कर्मठां तापसां । यया खुणेचिया माणुसां\- ।
माजीं तो येकु गा जैसा । पढिये मज ॥ १५१५ ॥
तैसा भूतळीं आघवा । आन न देखे पांडवा ।
जो गीता सांगें मेळावा । भक्तजनांचा ॥ १५१६ ॥
मज ईश्वराचेनि लोभें । हे गीता पढतां अक्षोभें ।
जो मंडन होय सभे । संतांचिये ॥ १५१७ ॥
नेत्रपल्लवीं रोमांचितु । मंदानिळें कांपवितु ।
आमोदजळें वोलवितु । फुलांचे डोळें ॥ १५१८ ॥
कोकिळा कलरवाचेनि मिषें । सद्गद बोलवीत जैसें ।
वसंत का प्रवेशे । मद्भक्त आरामीं ॥ १५१९ ॥
कां जन्माचें फळ चकोरां । होत जैं चंद्र ये अंबरा ।
नाना नवघन मयूरां । वो देत पावे ॥ १५२० ॥
तैसा सज्जनांच्या मेळापीं । गीतापद्यरत्नीं उमपीं ।
वर्षे जो माझ्या रूपीं । हेतु ठेऊनि ॥ १५२१ ॥
मग तयाचेनि पाडें । पढियंतें मज फुडें ।
नाहींचि गा मागेंपुढें । न्याहाळितां ॥ १५२२ ॥
अर्जुना हा ठायवरी । मी तयातें सूयें जिव्हारीं ।
जो गीतार्थाचें करी । परगुणें संतां ॥ १५२३ ॥


अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ।
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ ७०॥


पैं माझिया तुझिया मिळणीं । वाढिनली जे हे कहाणी ।
मोक्षधर्म का जिणीं । आलासे जेथें ॥ १५२४ ॥
तो हा सकळार्थप्रबोधु । आम्हां दोघांचा संवादु ।
न करितां पदभेदु । पाठेंचि जो पढे ॥ १५२५ ॥
तेणें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । मूळ अविद्येचिया आहुती ।
तोषविला होय सुमती । परमात्मा मी ॥ १५२६ ॥
घेऊनि गीतार्थ उगाणा । ज्ञानिये जें विचक्षणा ।
ठाकती तें गाणावाणा । गीतेचा तो लाहे ॥ १५२७ ॥
गीता पाठकासि असे । फळ अर्थज्ञाचि सरिसें ।
गीता माउलियेसि नसे । जाणें तान्हें ॥ १५२८ ॥


श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः ।
सोऽपि मुक्तः शुभा.ण्ल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ॥ ७१॥


आणि सर्वमार्गीं निंदा । सांडूनि आस्था पैं शुद्धा ।
गीताश्रवणीं श्रद्धा । उभारी जो ॥ १५२९ ॥
तयाच्या श्रवणपुटीं । गीतेचीं अक्षरें जंव पैठीं ।
होतीना तंव उठाउठीं । पळेचि पाप ॥ १५३० ॥
अटवियेमाजीं जैसा । वन्हि रिघतां सहसा ।
लंघिती का दिशा । वनौकें तियें ॥ १५३१ ॥
कां उदयाचळकुळीं । झळकतां अंशुमाळी ।
तिमिरें अंतराळीं । हारपती ॥ १५३२ ॥
तैसा कानाच्या महाद्वारीं । गीता गजर जेथ करी ।
तेथ सृष्टीचिये आदिवरी । जायचि पाप ॥ १५३३ ॥
ऐसी जन्मवेली धुवट । होय पुण्यरूप चोखट ।
याहीवरी अचाट । लाहे फळ ॥ १५३४ ॥
जें इये गीतेचीं अक्षरें । जेतुलीं कां कर्णद्वारें ।
रिघती तेतुले होती पुरे । अश्वमेध कीं ॥ १५३५ ॥
म्हणौनि श्रवणें पापें जाती । आणि धर्म धरी उन्नती ।
तेणें स्वर्गराज संपत्ती । लाहेचि शेखीं ॥ १५३६ ॥
तो पैं मज यावयालागीं । पहिलें पेणें करी स्वर्गीं ।
मग आवडे तंव भोगी । पाठीं मजचि मिळे ॥ १५३७ ॥
ऐसी गीता धनंजया । ऐकतया आणि पढतया ।
फळे महानंदें मियां । बहु काय बोलों ॥ १५३८ ॥
याकारणें हें असो । परी जयालागीं शास्त्रातिसो ।
केला तें तंव तुज पुसों । काज तुझें ॥ १५३९ ॥


कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा ।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥ ७२॥


तरी सांग पां पांडवा । हा शास्त्रसिद्धांतु आघवा ।
तुज एकचित्तें फावा । गेला आहे ? ॥ १५४० ॥
आम्हीं जैसें जया रीतीं । उगाणिलें कानांच्या हातीं ।
येरीं तैसेंचि तुझ्या चित्तीं । पेठें केलें कीं ? ॥ १५४१ ॥
अथवा माझारीं । गेलें सांडीविखुरी ।
किंवा उपेक्षेवरी । वाळूनि सांडिलें । ॥ १५४२ ॥
जैसें आम्हीं सांगितलें । तैसेंचि हृदयीं फावलें ।
तरी सांग पां वहिलें । पुसेन तें मी ॥ १५४३ ॥
तरी स्वाज्ञानजनितें । मागिलें मोहें तूतें ।
भुलविलें तो येथें । असे कीं नाहीं ? ॥ १५४४ ॥
हें बहु पुसों काई । सांगें तूं आपल्या ठायीं ।
कर्माकर्म कांहीं । देखतासी ? ॥ १५४५ ॥
पार्थु स्वानंदैकरसें । विरेल ऐसा भेददशे ।
आणिला येणें मिषें । प्रश्नाचेनि ॥ १५४६ ॥
पूर्णब्रह्म जाला पार्थु । तरी पुढील साधावया कार्यार्थु ।
मर्यादा श्रीकृष्णनाथु । उल्लंघों नेदी ॥ १५४७ ॥
येऱ्हवीं आपुलें करणें । सर्वज्ञ काय तो नेणें ? ।
परी केलें पुसणें । याचि लागीं ॥ १५४८ ॥
एवं करोनियां प्रश्न । नसतेंचि अर्जुनपण ।
आणूनियां जालें पूर्णपण । तें बोलवी स्वयें ॥ १५४९ ॥
मग क्षीराब्धीतें सांडितु । गगनीं पुंजु मंडितु ।
निवडे जैसा न निवडितु । पूर्णचंद्रु ॥ १५५० ॥
तैसा ब्रह्म मी हें विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे ।
हेंही सांडी तरी विरे । ब्रह्मपणही ॥ १५५१ ॥
ऐसा मोडतु मांडतु ब्रह्में । तो दुःखें देहाचिये सीमे ।
मी अर्जुन येणें नामें । उभा ठेला ॥ १५५२ ॥
मग कांपतां करतळीं । दडपूनि रोमावळी ।
पुलिका स्वेदजळीं । जिरऊनियां ॥ १५५३ ॥
प्राणक्षोभें डोलतया । आंगा आंगचि टेंकया ।
सूनि स्तंभु चाळया । भुलौनियां ॥ १५५४ ॥
नेत्रयुगुळाचेनि वोतें । आनंदामृताचें भरितें ।
वोसंडत तें मागुतें । काढूनियां ॥ १५५५ ॥
विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कंठीं ।
ते करूनियां पैठी । हृदयामाजीं ॥ १५५६ ॥
वाचेचें वितुळणें । सांवरूनि प्राणें ।
अक्रमाचें श्वसणें । ठेऊनि ठायीं ॥ १५५७ ॥


अर्जुन उवाच ।
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ ७३॥


मग अर्जुन म्हणे काय देवो । पुसताति आवडे मोहो ।
तरी तो सकुटुंब गेला जी ठावो । घेऊनि आपला ॥ १५५८ ॥
पासीं येऊनि दिनकरें । डोळ्यातें अंधारें ।
पुसिजे हें कायि सरे । कोणे गांवीं ? ॥ १५५९ ॥
तैसा तूं श्रीकृष्णराया । आमुचिया डोळयां ।
गोचर हेंचि कायिसया । न पुरे तंव ॥ १५६० ॥
वरी लोभें मायेपासूनी । तें सांगसी तोंड भरूनी ।
जें कायिसेनिही करूनी । जाणूं नये ॥ १५६१ ॥
आतां मोह असे कीं नाहीं । हें ऐसें जी पुससी काई ।
कृतकृत्य जाहलों पाहीं । तुझेपणें ॥ १५६२ ॥
गुंतलों होतों अर्जुनगुणें । तो मुक्त जालों तुझेपणें ।
आतां पुसणें सांगणें । दोन्ही नाहीं ॥ १५६३ ॥
मी तुझेनि प्रसादें । लाधलेनि आत्मबोधें ।
मोहाचे तया कांदे । नेदीच उरों ॥ १५६४ ॥
आतां करणें कां न करणें । हें जेणें उठी दुजेपणें ।
तें तूं वांचूनि नेणें । सर्वत्र गा ॥ १५६५ ॥
ये विषयीं माझ्या ठायीं । संदेहाचे नुरेचि कांहीं ।
त्रिशुद्धि कर्म जेथ नाहीं । तें मी जालों ॥ १५६६ ॥
तुझेनि मज मी पावोनी । कर्तव्य गेलें निपटूनी ।
परी आज्ञा तुझी वांचोनि । आन नाहीं प्रभो ॥ १५६७ ॥
कां जें दृश्य दृश्यातें नाशी । जें दुजें द्वैतातें ग्रासी ।
जें एक परी सर्वदेशीं । वसवी सदा ॥ १५६८ ॥
जयाचेनि संबंधें बंधु फिटे । जयाचिया आशा आस तुटे ।
जें भेटलया सर्व भेटे । आपणपांचि ॥ १५६९ ॥
तें तूं गुरुलिंग जी माझें । जें येकलेपणींचें विरजें ।
जयालागीं वोलांडिजे । अद्वैतबोधु ॥ १५७० ॥
आपणचि होऊनि ब्रह्म । सारिजे कृत्याकृत्यांचें काम ।
मग कीजे का निःसीम । सेवा जयाची ॥ १५७१ ॥
गंगा सिंधू सेवूं गेली । पावतांचि समुद्र जाली ।
तेवीं भक्तां सेल दिधली । निजपदाची ॥ १५७२ ॥
तो तूं माझा जी निरुपचारु । श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु ।
मा ब्रह्मतेचा उपकारु । हाचि मानीं ॥ १५७३ ॥
जें मज तुम्हां आड । होतें भेदाचें कवाड ।
तें फेडोनि केलें गोड । सेवासुख ॥ १५७४ ॥
तरी आतां तुझी आज्ञा । सकळ देवाधिदेवराज्ञा ।
करीन देईं अनुज्ञा । भलतियेविषयीं ॥ १५७५ ॥
यया अर्जुनाचिया बोला । देवो नाचे सुखें भुलला ।
म्हणे विश्वफळा जाला । फळ हा मज ॥ १५७६ ॥
उणेनि उमचला सुधाकरु । देखुनी आपला कुमरु ।
मर्यादा क्षीरसागरु । विसरेचिना ? ॥ १५७७ ॥
ऐसे संवादाचिया बहुलां । लग्न दोघांचियां आंतुला ।
लागलें देखोनि जाला । निर्भरु संजयो ॥ १५७८ ॥
तेणें म्हणतसे संजयो । बाप कृपानिधी रावो ।
तो आपुला मनोभावो । अर्जुनेंसी केला ॥ १५७९ ॥
तेणें उचंबळलेपणें । संजय धृतराष्ट्रातें म्हणे ।
जी कैसे बादरायणें । रक्षिलों दोघे ? ॥ १५८० ॥
आजि तुमतें अवधारा । नाहीं चर्मचक्षूही संसारा ।
कीं ज्ञानदृष्टिव्यवहारा आणिलेती ॥ १५८१ ॥
आणि रथींचिये राहाटी । घेई जो घोडेयासाठीं ।
तया आम्हां या गोष्टी । गोचरा होती ॥ १५८२ ॥
वरी जुंझाचें निर्वाण । मांडलें असे दारुण ।
दोहीं हारीं आपण । हारपिजे जैसें ॥ १५८३ ॥
येवढा जिये सांकडां । कैसा अनुग्रहो पैं गाढा ।
जे ब्रह्मानंदु उघडा । भोगवीतसे ॥ १५८४ ॥
ऐसें संजय बोलिला । परी न द्रवे येरु उगला ।
चंद्रकिरणीं शिवतला । पाषाणु जैसा ॥ १५८५ ॥
हे देखोनि तयाची दशा । मग करीचिना सरिसा ।
परी सुखें जाला पिसा । बोलतसे ॥ १५८६ ॥
भुलविला हर्षवेगें । म्हणौनि धृतराष्ट्रा सांगे ।
येऱ्हवीं नव्हे तयाजोगें । हें कीर जाणें ॥ १५८७ ॥


सञ्जय उवाच ।
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः ।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ ७४॥


मग म्हणे पैं कुरुराजा । ऐसा बंधुपुत्र तो तुझा ।
बोलिला तें अधोक्षजा । गोड जालें ॥ १५८८ ॥
अगा पूर्वापर सागर । ययां नामसीचि सिनार ।
येर आघवें तें नीर । एक जैसें ॥ १५८९ ॥
तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसें । हें आंगाचिपासीं दिसे ।
मग संवादीं जी नसे । कांहींचि भेदु ॥ १५९० ॥
पैं दर्पणाहूनि चोखें । दोन्ही होती सन्मुखें ।
तेथ येरी येर देखे । आपणपें जैसें ॥ १५९१ ॥
तैसा देवेसीं पंडुसुतु । आपणपें देवीं देखतु ।
पांडवेंसीं देखे अनंतु । आपणपें पार्थीं ॥ १५९२ ॥
देव देवो भक्तालागीं । जिये विवरूनि देखे आंगीं ।
येरु तियेचेही भागीं । दोन्ही देखे ॥ १५९३ ॥
आणिक कांहींच नाहीं । म्हणौनि करिती काई ।
दोघे येकपणें पाहीं । नांदताती ॥ १५९४ ॥
आतां भेदु जरी मोडे । तरी प्रश्नोत्तर कां घडे ? ।
ना भेदुचि तरी जोडे । संवादसुख कां ? ॥ १५९५ ॥
ऐसें बोलतां दुजेपणें । संवादीं द्वैत गिळणें ।
तें ऐकिलें बोलणें । दोघांचें मियां ॥ १५९६ ॥
उटूनि दोन्ही आरिसे । वोडविलीया सरिसे ।
कोण कोणा पाहातसे । कल्पावें पां ? ॥ १५९७ ॥
कां दीपासन्मुखु । ठेविलया दीपकु ।
कोण कोणा अर्थिकु । कोण जाणें ॥ १५९८ ॥
नाना अर्कापुढें अर्कु । उदयलिया आणिकु ।
कोण म्हणे प्रकाशकु । प्रकाश्य कवण ? ॥ १५९९ ॥
हें निर्धारूं जातां फुडें । निर्धारासि ठक पडे ।
ते दोघे जाले एवढे । संवादें सरिसे ॥ १६०० ॥
जी मिळतां दोन्ही उदकें । माजी लवण वारूं ठाके ।
कीं तयासींही निमिखें । तेंचि होय ॥ १६०१ ॥
तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही । संवादले तें मनीं ।
धरितां मजही वानी । तेंचि होतसे ॥ १६०२ ॥
ऐसें म्हणे ना मोटकें । तंव हिरोनि सात्विकें ।
आठव नेला नेणों कें । संजयपणाचा ॥ १६०३ ॥
रोमांच जंव फरके । तंव तंव आंग सुरके ।
स्तंभ स्वेदांतें जिंके । एकला कंपु ॥ १६०४ ॥
अद्वयानंदस्पर्शें । दिठी रसमय जाली असे ।
ते अश्रु नव्हती जैसें । द्रवत्वचि ॥ १६०५ ॥
नेणों काय न माय पोटीं । नेणों काय गुंफे कंठीं ।
वागर्था पडत मिठी । उससांचिया ॥ १६०६ ॥
किंबहुना सात्विकां आठां । चाचरु मांडतां उमेठा ।
संजयो जालासे चोहटां । संवादसुखाचा ॥ १६०७ ॥
तया सुखाची ऐसी जाती । जे आपणचि धरी शांती ।
मग पुढती देहस्मृती । लाधली तेणें ॥ १६०८ ॥


व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम् ।
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम् ॥ ७५॥


तेव्हां बैसतेनि आनंदें । म्हणे जी जें उपनिषदें ।
नेणती तें व्यासप्रसादें । ऐकिलें मियां ॥ १६०९ ॥
ऐकतांचि ते गोठी । ब्रह्मत्वाची पडिली मिठी ।
मीतूंपणेंसीं दृष्टी । विरोनि गेली ॥ १६१० ॥
हे आघवेचि का योग । जया ठाया येती मार्ग ।
तयाचें वाक्य सवंग । केलें मज व्यासें ॥ १६११ ॥
अहो अर्जुनाचेनि मिषें । आपणपेंचि दुजें ऐसें ।
नटोनि आपणया उद्देशें । बोलिलें जें देव ॥ १६१२ ॥
तेथ कीं माझें श्रोत्र । पाटाचें जालें जी पात्र ।
काय वानूं स्वतंत्र । सामर्थ्य श्रीगुरुचें ॥ १६१३ ॥


राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् ।
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ ७६॥


राया हें बोलतां विस्मित होये । तेणेंचि मोडावला ठाये ।
रत्नीं कीं रत्नकिळा ये । झांकोळित जैसी ॥ १६१४ ॥
हिमवंतींचीं सरोवरें । चंद्रोदयीं होती काश्मीरें ।
मग सूर्यागमीं माघारें । द्रवत्व ये ॥ १६१५ ॥
तैसा शरीराचिया स्मृती । तो संवादु संजय चित्तीं ।
धरी आणि पुढती । तेंचि होय ॥ १६१६ ॥


तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः ।
विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ॥ ७७॥


मग उठोनि म्हणे नृपा । श्रीहरीचिया विश्वरूपा ।
देखिलया उगा कां पां । असों लाहसी ? ॥ १६१७ ॥
न देखणेनि जें दिसे । नाहींपणेंचि जें असे ।
विसरें आठवे तें कैसें । चुकऊं आतां । ॥ १६१८ ॥
देखोनि चमत्कारु । कीजे तो नाहीं पैसारु ।
मजहीसकट महापूरु । नेत आहे ॥ १६१९ ॥
ऐसा श्रीकृष्णार्जुन- । संवाद संगमीं स्नान ।
करूनि देतसे तिळदान । अहंतेचें ॥ १६२० ॥
तेथ असंवरें आनंदें । अलौकिकही कांहीं स्फुंदे ।
श्रीकृष्ण म्हणे सद्गदें । वेळोवेळां ॥ १६२१ ॥
या अवस्थांची कांहीं । कौरवांतें परी नाहीं ।
म्हणौनि रायें तें कांहीं । कल्पावें जंव ॥ १६२२ ॥
तंव जाला सुखलाभु । आपणया करूनि स्वयंभु ।
बुझाविला अवष्टंभु । संजयें तेणें ॥ १६२३ ॥
तेथ कोणी येकी अवसरी । होआवी ते करूनि दुरी ।
रावो म्हणे संजया परी । कैसी तुझी गा ? ॥ १६२४ ॥
तेणें तूंतें येथें व्यासें । बैसविलें कासया उद्देशें ।
अप्रसंगामाजीं ऐसें । बोलसी काई ? ॥ १६२५ ॥
रानींचें राउळा नेलिया । दाही दिशा मानी सुनिया ।
कां रात्री होय पाहलया । निशाचरां ॥ १६२६ ॥
जो जेथिंचें गौरव नेणें । तयासि तें भिंगुळवाणें ।
म्हणौनि अप्रसंगु तेणें । म्हणावा कीं तो ॥ १६२७ ॥
मग म्हणे सांगें प्रस्तुत । उदयलेंसे जें उत्कळित ।
तें कोणासि बा रे जैत । देईल शेखीं ? ॥ १६२८ ॥
येऱ्हवीं विशेषें बहुतेक । आमुचें ऐसें मानसिक ।
जे दुर्योधनाचे अधिक । प्रताप सदा ॥ १६२९ ॥
आणि येरांचेनि पाडें । दळही याचें देव्हडें ।
म्हणौनि जैत फुडें । आणील ना तें ? ॥ १६३० ॥
आम्हां तंव गमे ऐसें । मा तुझें ज्योतिष कैसें ।
तें नेणों संजया असे । तैसें सांग पां ॥ १६३१ ॥


यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ ७८॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥


यया बोला संजयो म्हणे । जी येरयेरांचें मी नेणें ।
परी आयुष्य तेथें जिणें । हें फुडें कीं गा ॥ १६३२ ॥
चंद्रु तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका ।
संत तेथें विवेका । असणें कीं जी ॥ १६३३ ॥
रावो तेथें कटक । सौजन्य तेथें सोयरीक ।
वन्हि तेथें दाहक । सामर्थ्य कीं ॥ १६३४ ॥
दया तेथें धर्मु । धर्मु तेथें सुखागमु ।
सुखीं पुरुषोत्तमु । असे जैसा ॥ १६३५ ॥
वसंत तेथें वनें । वन तेथें सुमनें ।
सुमनीं पालिंगनें । सारंगांचीं ॥ १६३६ ॥
गुरु तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन ।
दर्शनीं समाधान । आथी जैसें ॥ १६३७ ॥
भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु ।
हें असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथें ॥ १६३८ ॥
तैसे सकल पुरुषार्थ । जेणें स्वामी कां सनाथ ।
तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥ १६३९ ॥
आणि आपुलेनि कांतेंसीं । ते जगदंबा जयापासीं ।
अणिमादिकीं काय दासी । नव्हती तयातें ? ॥ १६४० ॥
कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणें भागें ।
तैं जयो लागवेगें । तेथेंचि आहे ॥ १६४१ ॥
विजयो नामें अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु ।
श्रियेसीं विजय निश्चितु । तेथेंचि असे ॥ १६४२ ॥
तयाचिये देशींच्या झाडीं । कल्पतरूतें होडी ।
न जिणावें कां येवढीं । मायबापें असतां ? ॥ १६४३ ॥
ते पाषाणही आघवें । चिंतारत्‌नें कां नोहावे ? ।
तिये भूमिके कां न यावें । सुवर्णत्व ? ॥ १६४४ ॥
तयाचिया गांवींचिया । नदी अमृतें वाहाविया ।
नवल कायि राया । विचारीं पां ॥ १६४५ ॥
तयाचे बिसाट शब्द । सुखें म्हणों येती वेद ।
सदेह सच्चिदानंद । कां न व्हावे ते ? ॥ १६४६ ॥
पैं स्वर्गापवर्ग दोन्ही । इयें पदें जया अधीनीं ।
तो श्रीकृष्ण बाप जननी । कमळा जया ॥ १६४७ ॥
म्हणौनि जिया बाहीं उभा । तो लक्ष्मीयेचा वल्लभा ।
तेथें सर्वसिद्धी स्वयंभा । येर मी नेणें ॥ १६४८ ॥
आणि समुद्राचा मेघु । उपयोगें तयाहूनि चांगु ।
तैसा पार्थीं आजि लागु । आहे तये ॥ १६४९ ॥
कनकत्वदीक्षागुरू । लोहा परिसु होय कीरू ।
परी जगा पोसिता व्यवहारु । तेंचि जाणें ॥ १६५० ॥
येथ गुरुत्वा येतसे उणें । ऐसें झणें कोण्ही म्हणे ।
वन्हि प्रकाश दीपपणें । प्रकाशी आपुला ॥ १६५१ ॥
तैसा देवाचिया शक्ती । पार्थु देवासीचि बहुती ।
परी माने इये स्तुती । गौरव असे ॥ १६५२ ॥
आणि पुत्रें मी सर्व गुणीं । जिणावा हे बापा शिराणी ।
तरी ते शारङ्गपाणी । फळा आली ॥ १६५३ ॥
किंबहुना ऐसा नृपा । पार्थु जालासे कृष्णकृपा ।
तो जयाकडे साक्षेपा । रीति आहे ॥ १६५४ ॥
तोचि गा विजयासि ठावो । येथ तुज कोण संदेहो ? ।
तेथ न ये तरी वावो । विजयोचि होय ॥ १६५५ ॥
म्हणौनि जेथ श्री तेथें श्रीमंतु । जेथ तो पंडूचा सुतु ।
तेथ विजय समस्तु । अभ्युदयो तेथ ॥ १६५६ ॥
जरी व्यासाचेनि साचें । धिरे मन तुमचें ।
तरी या बोलाचें । ध्रुवचि माना ॥ १६५७ ॥
जेथ तो श्रीवल्लभु । जेथ भक्तकदंबु ।
तेथ सुख आणि लाभु । मंगळाचा ॥ १६५८ ॥
या बोला आन होये । तरी व्यासाचा अंकु न वाहे ।
ऐसें गाजोनि बाहें । उभिली तेणें ॥ १६५९ ॥
एवं भारताचा आवांका । आणूनि श्लोका येका ।
संजयें कुरुनायका । दिधला हातीं ॥ १६६० ॥
जैसा नेणों केवढा वन्ही । परी गुणाग्रीं ठेऊनी ।
आणिजे सूर्याची हानी । निस्तरावया ॥ १६६१ ॥
तैसें शब्दब्रह्म अनंत । जालें सवालक्ष भारत ।
भारताचें शतें सात । सर्वस्व गीता ॥ १६६२ ॥
तयांही सातां शतांचा । इत्यर्थु हा श्लोक शेषींचा ।
व्यासशिष्य संजयाचा । पूर्णोद्गारु जो ॥ १६६३ ॥
येणें येकेंचि श्लोकें । राहे तेणें असकें ।
अविद्याजाताचें निकें । जिंतलें होय ॥ १६६४ ॥
ऐसें श्लोक शतें सात । गीतेचीं पदें आंगें वाहत ।
पदें म्हणों कीं परमामृत । गीताकाशींचें ॥ १६६५ ॥
कीं आत्मराजाचिये सभे । गीते वोडवले हे खांबे ।
मज श्लोक प्रतिभे । ऐसे येत ॥ १६६६ ॥
कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती ।
मोहमहिषा मुक्ति । आनंदली असे ॥ १६६७ ॥
म्हणौनि मनें कायें वाचा । जो सेवकु होईल इयेचा ।
तो स्वानंदासाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥ १६६८ ॥
कीं अविद्यातिमिररोंखें । श्लोक सूर्यातें पैजा जिंकें ।
ऐसे प्रकाशिले गीतामिषें । रायें श्रीकृष्णें ॥ १६६९ ॥
कीं श्लोकाक्षरद्राक्षलता । मांडव जाली आहे गीता ।
संसारपथश्रांता । विसंवावया ॥ १६७० ॥
कीं सभाग्यसंतीं भ्रमरीं । केले ते श्लोककल्हारीं ।
श्रीकृष्णाख्यसरोवरीं । सासिन्नली हे ॥ १६७१ ॥
कीं श्लोक नव्हती आन । गमे गीतेचें महिमान ।
वाखाणिते बंदीजन । उदंड जैसे ॥ १६७२ ॥
कीं श्लोकांचिया आवारा । सात शतें करूनि सुंदरा ।
सर्वागम गीतापुरा । वसों आले ॥ १६७३ ॥
कीं निजकांता आत्मया । आवडी गीता मिळावया ।
श्लोक नव्हती बाह्या । पसरु का जो ॥ १६७४ ॥
कीं गीताकमळींचे भृंग । कीं हे गीतासागरतरंग ।
कीं हरीचे हे तुरंग । गीतारथींचे ॥ १६७५ ॥
कीं श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतेगंगे आंतु ।
जे अर्जुन नर सिंहस्थु । जाला म्हणौनि ॥ १६७६ ॥
कीं नोहे हे श्लोकश्रेणी । अचिंत्यचित्तचिंतामणी ।
कीं निर्विकल्पां लावणी । कल्पतरूंची ॥ १६७७ ॥
ऐसिया शतें सात श्लोकां । परी आगळा येकयेका ।
आतां कोण वेगळिका । वानावां पां । ॥ १६७८ ॥
तान्ही आणि पारठी । इया कामधेनूतें दिठी ।
सूनि जैसिया गोठी । कीजती ना ॥ १६७९ ॥
दीपा आगिलु मागिलु । सूर्यु धाकुटा वडीलु ।
अमृतसिंधु खोलु । उथळु कायसा । ॥ १६८० ॥
तैसे पहिले सरते । श्लोक न म्हणावे गीते ।
जुनीं नवीं पारिजातें । आहाती काई ? ॥ १६८१ ॥
आणि श्लोका पाडु नाहीं । हें कीर समर्थु काई ।
येथ वाच्य वाचकही । भागु न धरी ॥ १६८२ ॥
जे इये शास्त्रीं येकु । श्रीकृष्णचि वाच्य वाचकु ।
हें प्रसिद्ध जाणे लोकु । भलताही ॥ १६८३ ॥
येथें अर्थें तेंचि पाठें । जोडे येवढेनि धटें ।
वाच्यवाचक येकवटें । साधितें शास्त्र ॥ १६८४ ॥
म्हणौनि मज कांहीं । समर्थनीं आतां विषय नाहीं ।
गीता जाणा हे वाङ्ग्मयी । श्रीमूर्ति प्रभूचि ॥ १६८५ ॥
शास्त्र वाच्यें अर्थें फळे । मग आपण मावळे ।
तैसें नव्हें हें सगळें । परब्रह्मचि ॥ १६८६ ॥
कैसा विश्वाचिया कृपा । करूनि महानंद सोपा ।
अर्जुनव्याजें रूपा । आणिला देवें ॥ १६८७ ॥
चकोराचेनि निमित्तें । तिन्ही भुवनें संतप्तें ।
निवविलीं कळांवतें । चंद्रें जेवीं ॥ १६८८ ॥
कां गौतमाचेनि मिषें । कळिकाळज्वरीतोद्देशें ।
पाणिढाळु गिरीशें । गंगेंचा केला ॥ १६८९ ॥
तैसें गीतेचें हें दुभतें । वत्स करूनि पार्थातें ।
दुभिन्नली जगापुरतें । श्रीकृष्ण गाय ॥ १६९० ॥
येथे जीवें जरी नाहाल । तरी हेंचि कीर होआल ।
नातरी पाठमिषें तिंबाल । जीभचि जरी ॥ १६९१ ॥
तरी लोह एकें अंशें । झगटलिया परीसें ।
येरीकडे अपैसें । सुवर्ण होय ॥ १६९२ ॥
तैसी पाठाची ते वाटी । श्लोकपाद लावा ना जंव वोठीं ।
तंव ब्रह्मतेची पुष्टी । येईल आंगा ॥ १६९३ ॥
ना येणेसीं मुख वांकडें । करूनि ठाकाल कानवडें ।
तरी कानींही घेतां पडे । तेचि लेख ॥ १६९४ ॥
जे हे श्रवणें पाठें अर्थें । गीता नेदी मोक्षाआरौतें ।
जैसा समर्थु दाता कोण्हातें । नास्ति न म्हणे ॥ १६९५ ॥
म्हणौनि जाणतया सवा । गीताचि येकी सेवा ।
काय कराल आघवां । शास्त्रीं येरीं ॥ १६९६ ॥
आणि कृष्णार्जुनीं मोकळी । गोठी चावळिली जे निराळी ।
ते श्रीव्यासें केली करतळीं । घेवों ये ऐसी ॥ १६९७ ॥
बाळकातें वोरसें । माय जैं जेवऊं बैसे ।
तैं तया ठाकती तैसे । घांस करी ॥ १६९८ ॥
कां अफाटा समीरणा । आपैतेंपण शाहाणा ।
केलें जैसें विंजणा । निर्मूनियां ॥ १६९९ ॥
तैसें शब्दें जें न लभे । तें घडूनिया अनुष्टुभें ।
स्त्रीशूद्रादि प्रतिभे । सामाविलें ॥ १७०० ॥
स्वातीचेनि पाणियें । न होती जरी मोतियें ।
तरी अंगीं सुंदरांचिये । कां शोभिती तियें ? ॥ १७०१ ॥
नादु वाद्या न येतां । तरी कां गोचरु होता ।
फुलें न होतां घेपता । आमोदु केवीं ? ॥ १७०२ ॥
गोडीं न होती पक्वान्नें । तरी कां फावती रसनें ? ।
दर्पणावीण नयनें । नयनु कां दिसे ? ॥ १७०३ ॥
द्रष्टा श्रीगुरुमूर्ती । न रिगता दृश्यपंथीं ।
तरी कां ह्या उपास्ती । आकळता तो ? ॥ १७०४ ॥
तैसें वस्तु जें असंख्यात । तया संख्या शतें सात ।
न होती तरी कोणा येथ । फावों शकतें ? ॥ १७०५ ॥
मेघ सिंधूचें पाणी वाहे । तरी जग तयातेंचि पाहे ।
कां जे उमप ते नोहें । ठाकतें कोण्हा ॥ १७०६ ॥
आणि वाचा जें न पवे । तें हे श्लोक न होते बरवे ।
तरी कानें मुखें फावे । ऐसें कां होतें ? ॥ १७०७ ॥
म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु । विश्वा जाला उपकारु ।
जे श्रीकृष्ण उक्ती आकारु । ग्रंथाचा केला ॥ १७०८ ॥
आणि तोचि हा मी आतां । श्रीव्यासाचीं पदें पाहतां पाहतां ।
आणिला श्रवणपथा । मऱ्हाठिया ॥ १७०९ ॥
व्यासादिकांचे उन्मेख । राहाटती जेथ साशंक ।
तेथ मीही रंक येक । चावळी करीं ॥ १७१० ॥
परी गीता ईश्वरु भोळा । ले व्यासोक्तिकुसुममाळा ।
तरी माझिया दुर्वादळा । ना न म्हणे कीं ॥ १७११ ॥
आणि क्षीरसिंधूचिया तटा । पाणिया येती गजघटा ।
तेथ काय मुरकुटा । वारिजत असे ? ॥ १७१२ ॥
पांख फुटे पांखिरूं । नुडे तरी नभींच स्थिरू ।
गगन आक्रमी सत्वरू । तो गरुडही तेथ ॥ १७१३ ॥
राजहंसाचें चालणें । भूतळीं जालिया शाहाणें ।
आणिकें काय कोणें । चालावेचिना ? ॥ १७१४ ॥
जी आपुलेनि अवकाशें । अगाध जळ घेपे कलशें ।
चुळीं चूळपण ऐसें । भरूनि न निघे ? ॥ १७१५ ॥
दिवटीच्या आंगीं थोरी । तरी ते बहु तेज धरी ।
वाती आपुलिया परी । आणीच कीं ना ? ॥ १७१६ ॥
जी समुद्राचेनि पैसें । समुद्रीं आकाश आभासे ।
थिल्लरीं थिल्लरा{ऐ}सें । बिंबेचि पैं ॥ १७१७ ॥
तेवीं व्यासादिक महामती । वावरों येती इये ग्रंथीं ।
मा आम्ही ठाकों हे युक्ति । न मिळे कीर ? ॥ १७१८ ॥
जिये सागरीं जळचरें । संचरती मंदराकारें ।
तेथ देखोनि शफरें येरें । पोहों न लाहती ? ॥ १७१९ ॥
अरुण आंगाजवळिके । म्हणौनि सूर्यातें देखें ।
मा भूतळींची न देखे । मुंगी काई ? ॥ १७२० ॥
यालागीं आम्हां प्राकृतां । देशिकारें बंधें गीता ।
म्हणणें हें अनुचिता । कारण नोहे ॥ १७२१ ॥
आणि बापु पुढां जाये । ते घेत पाउलाची सोये ।
बाळ ये तरी न लाहे । पावों कायी ? ॥ १७२२ ॥
तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकारातें वाट पुसतु ।
अयोग्यही मी न पवतु । कें जाईन ? ॥ १७२३ ॥
आणि पृथ्वी जयाचिया क्षमा । नुबगे स्थावर जंगमा ।
जयाचेनि अमृतें चंद्रमा । निववी जग ॥ १७२४ ॥
जयाचें आंगिक असिकें । तेज लाहोनि अर्कें ।
आंधाराचें सावाइकें । लोटिजत आहे ॥ १७२५ ॥
समुद्रा जयाचें तोय । तोया जयाचें माधुर्य ।
माधुर्या सौंदर्य । जयाचेनि ॥ १७२६ ॥
पवना जयाचें बळ । आकाश जेणें पघळ ।
ज्ञान जेणें उज्वळ । चक्रवर्ती ॥ १७२७ ॥
वेद जेणें सुभाष । सुख जेणें सोल्लास ।
हें असो रूपस । विश्व जेणें ॥ १७२८ ॥
तो सर्वोपकारी समर्थु । सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथु ।
राहाटत असे मजही आंतु । रिघोनियां ॥ १७२९ ॥
आतां आयती गीता जगीं । मी सांगें मऱ्हाठिया भंगीं ।
येथ कें विस्मयालागीं । ठावो आहे ॥ १७३० ॥
श्रीगुरुचेनि नांवें माती । डोंगरीं जयापासीं होती ।
तेणें कोळियें त्रिजगतीं । येकवद केली ॥ १७३१ ॥
चंदनें वेधलीं झाडें । जालीं चंदनाचेनि पाडें ।
वसिष्ठें मांनिली कीं भांडे । भानूसीं शाटी ॥ १७३२ ॥
मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला ।
जो दिठीवेनि आपुला । बैसवी पदीं ॥ १७३३ ॥
आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी ।
तैं न दिसे ऐसी गोठी । केंही आहे ? ॥ १७३४ ॥
म्हणौनि माझें नित्य नवे । श्वासोश्वासही प्रबंध होआवे ।
श्रीगुरुकृपा काय नोहे । ज्ञानदेवो म्हणे ॥ १७३५ ॥
याकारणें मियां । श्रीगीतार्थु मऱ्हाठिया ।
केला लोकां यया । दिठीचा विषो ॥ १७३६ ॥
परी मऱ्हाठे बोलरंगें । कवळितां पैं गीतांगें ।
तैं गातयाचेनि पांगें । येकाढतां नोहे ॥ १७३७ ॥
म्हणौनि गीता गावों म्हणे । तें गाणिवें होती लेणें ।
ना मोकळे तरी उणें । गीताही आणित ॥ १७३८ ॥
सुंदर आंगीं लेणें न सूये । तैं तो मोकळा शृंगारु होये ।
ना लेइलें तरी आहे । तैसें कें उचित ? ॥ १७३९ ॥
कां मोतियांची जैसी जाती । सोनयाही मान देती ।
नातरी मानविती । अंगेंचि सडीं ॥ १७४० ॥
नाना गुंफिलीं कां मोकळीं । उणीं न होती परीमळीं ।
वसंतागमींचीं वाटोळीं । मोगरीं जैसीं ॥ १७४१ ॥
तैसा गाणिवेतें मिरवी । गीतेवीणही रंगु दावीं ।
तो लाभाचा प्रबंधु ओंवी । केला मियां ॥ १७४२ ॥
तेणें आबालसुबोधें । ओवीयेचेनि प्रबंधें ।
ब्रह्मरससुस्वादें । अक्षरें गुंथिलीं ॥ १७४३ ॥
आतां चंदनाच्या तरुवरीं । परीमळालागीं फुलवरीं ।
पारुखणें जियापरी । लागेना कीं ॥ १७४४ ॥
तैसा प्रबंधु हा श्रवणीं । लागतखेंवो समाधि आणी ।
ऐकिलियाही वाखाणी । काय व्यसन न लवी ? ॥ १७४५ ॥
पाठ करितां व्याजें । पांडित्यें येती वेषजे ।
तैं अमृतातें नेणिजे । फावलिया ॥ १७४६ ॥
तैसेंनि आइतेपणें । कवित्व जालें हें उपेणें ।
मनन निदिध्यास श्रवणें । जिंतिलें आतां ॥ १७४७ ॥
हे स्वानंदभोगाची सेल । भलतयसीचि देईल ।
सर्वेंद्रियां पोषवील । श्रवणाकरवीं ॥ १७४८ ॥
चंद्रातें आंगवणें । भोगूनि चकोर शाहाणे ।
परी फावे जैसें चांदिणें । भलतयाही ॥ १७४९ ॥
तैसें अध्यात्मशास्त्रीं यिये । अंतरंगचि अधिकारिये ।
परी लोकु वाक्चातुर्यें । होईल सुखिया ॥ १७५० ॥
ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें । गौरव आहे जी साचें ।
ग्रंथु नोहे हें कृपेचें । वैभव तिये ॥ १७५१ ॥
क्षीरसिंधु परिसरीं । शक्तीच्या कर्णकुहरीं ।
नेणों कैं श्रीत्रिपुरारीं । सांगितलें जें ॥ १७५२ ॥
तें क्षीरकल्लोळाआंतु । मकरोदरीं गुप्तु ।
होता तयाचा हातु । पैठें जालें ॥ १७५३ ॥
तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं । भग्नावयवा चौरंगी ।
भेटला कीं तो सर्वांगीं । संपूर्ण जाला ॥ १७५४ ॥
मग समाधि अव्युत्थया । भोगावी वासना यया ।
ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनीं ॥ १७५५ ॥
तेणें योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु ।
तिये पदीं कां सर्वेश्वरु । अभिषेकिला ॥ १७५६ ॥
मग तिहीं तें शांभव । अद्वयानंदवैभव ।
संपादिलें सप्रभव । श्रीगहिनीनाथा ॥ १७५७ ॥
तेणें कळिकळितु भूतां । आला देखोनि निरुता ।
ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा । दिधली ऐसी ॥ १७५८ ॥
ना आदिगुरु शंकरा\- । लागोनि शिष्यपरंपरा ।
बोधाचा हा संसरा । जाला जो आमुतें ॥ १७५९ ॥
तो हा तूं घेऊनि आघवा । कळीं गिळितयां जीवां ।
सर्व प्रकारीं धांवा । करीं पां वेगीं ॥ १७६० ॥
आधींच तंव तो कृपाळु । वरी गुरुआज्ञेचा बोलू ।
जाला जैसा वर्षाकाळू । खवळणें मेघां ॥ १७६१ ॥
मग आर्ताचेनि वोरसें । गीतार्थग्रंथनमिसें ।
वर्षला शांतरसें । तो हा ग्रंथु ॥ १७६२ ॥
तेथ पुढां मी बापिया । मांडला आर्ती आपुलिया ।
कीं यासाठीं येवढिया । आणिलों यशा ॥ १७६३ ॥
एवं गुरुक्रमें लाधलें । समाधिधन जें आपुलें ।
तें ग्रंथें बोधौनि दिधलें । गोसावी मज ॥ १७६४ ॥
वांचूनि पढे ना वाची । ना सेवाही जाणें स्वामीची ।
ऐशिया मज ग्रंथाची । योग्यता कें असे ? ॥ १७६५ ॥
परी साचचि गुरुनाथें । निमित्त करूनि मातें ।
प्रबंधव्याजें जगातें । रक्षिलें जाणा ॥ १७६६ ॥
तऱ्ही पुरोहितगुणें । मी बोलिलों पुरें उणें ।
तें तुम्हीं माउलीपणें । उपसाहिजो जी ॥ १७६७ ॥
शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजें ।
अळंकारु म्हणिजे । काय तें नेणें ॥ १७६८ ॥
सायिखडेयाचें बाहुलें । चालवित्या सूत्राचेनि चाले ।
तैसा मातें दावीत बोले । स्वामी तो माझा ॥ १७६९ ॥
यालागीं मी गुणदोष\- । विषीं क्षमाविना विशेष ।
जे मी संजात ग्रंथलों देख । आचार्यें कीं ॥ १७७० ॥
आणि तुम्हां संतांचिये सभे । जें उणीवेंसी ठाके उभें ।
तें पूर्ण नोहे तरी तैं लोभें । तुम्हांसीचि कोपें ॥ १७७१ ॥
सिवतलियाही परीसें । लोहत्वाचिये अवदसे ।
न मुकिजे आयसें । तैं कवणा बोलु । ॥ १७७२ ॥
वोहळें हेंचि करावें । जे गंगेचें आंग ठाकावें ।
मगही गंगा जरी नोहावें । तैं तो काय करी ? ॥ १७७३ ॥
म्हणौनि भाग्ययोगें बहुवें । तुम्हां संतांचें मी पाये ।
पातलों आतां कें लाहे । उणें जगीं । ॥ १७७४ ॥
अहो जी माझेनि स्वामी । मज संत जोडुनि तुम्हीं ।
दिधलेति तेणें सर्वकामीं । परीपूर्ण जालों ॥ १७७५ ॥
पाहा पां मातें तुम्हां सांगडें । माहेर तेणें सुरवाडें ।
ग्रंथाचें आळियाडें । सिद्धी गेलें ॥ १७७६ ॥
जी कनकाचें निखळ । वोतूं येईल भूमंडळ ।
चिंतारत्‌नीं कुळाचळ । निर्मूं येती ॥ १७७७ ॥
सातांही हो सागरांतें । सोपें भरितां अमृतें ।
दुवाड नोहे तारांतें । चंद्र करितां ॥ १७७८ ॥
कल्पतरूचे आराम । लावितां नाहीं विषम ।
परी गीतार्थाचें वर्म । निवडूं न ये ॥ १७७९ ॥
तो मी येकु सर्व मुका । बोलोनि मऱ्हाठिया भाखा ।
करी डोळेवरी लोकां । घेवों ये ऐसें जें ॥ १७८० ॥
हा ग्रंथसागरु येव्हढा । उतरोनि पैलीकडा ।
कीर्तिविजयाचा धेंडा । नाचे जो कां ॥ १७८१ ॥
गीतार्थाचा आवारु । कलशेंसीं महामेरु ।
रचूनि माजीं श्रीगुरु\- । लिंग जें पूजीं ॥ १७८२ ॥
गीता निष्कपट माय । चुकोनि तान्हें हिंडे जें वाय ।
तें मायपूता भेटी होय । हा धर्म तुमचा ॥ १७८३ ॥
तुम्हां सज्जनांचें केलें । आकळुनी जी मी बोलें ।
ज्ञानदेव म्हणे थेंकुलें । तैसें नोहें ॥ १७८४ ॥
काय बहु बोलों सकळां । मेळविलों जन्मफळा ।
ग्रंथसिद्धीचा सोहळा । दाविला जो हा ॥ १७८५ ॥
मियां जैसजैसिया आशा । केला तुमचा भरंवसा ।
ते पुरवूनि जी बहुवसा । आणिलों सुखा ॥ १७८६ ॥
मजलागीं ग्रंथाची स्वामी । दुजीं सृष्टी जे हे केली तुम्ही ।
तें पाहोनि हांसों आम्हीं । विश्वामित्रातेंही ॥ १७८७ ॥
जे असोनि त्रिशंकुदोषें । धातयाही आणावें वोसें ।
तें नासतें कीजे कीं ऐसें । निर्मावें नाहीं ॥ १७८८ ॥
शंभू उपमन्युचेनि मोहें । क्षीरसागरूही केला आहे ।
येथ तोही उपमे सरी नोहे । जे विषगर्भ कीं ॥ १७८९ ॥
अंधकारु निशाचरां । गिळितां सूर्यें चराचरां ।
धांवा केला तरी खरा । ताउनी कीं तो ॥ १७९० ॥
तातलियाही जगाकारणें । चंद्रें वेंचिलें चांदणें ।
तया सदोषा केवीं म्हणे । सारिखें हें ॥ १७९१ ॥
म्हणौनि तुम्हीं मज संतीं । ग्रंथरूप जो हा त्रिजगतीं ।
उपयोग केला तो पुढती । निरुपम जी ॥ १७९२ ॥
किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें ।
येथ माझें जी उरलें । पाईकपण ॥ १७९३ ॥
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १७९४ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ १७९५ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ १७९६ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ॥ १७९७ ॥
चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ १७९८ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ १७९९ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १८०० ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकींयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ १८०१ ॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ १८०२ ॥
ऐसें युगीं परी कळीं । आणि महाराष्ट्रमंडळीं ।
श्रीगोदावरीच्या कूलीं । दक्षिणलिंगीं ॥ १८०३ ॥
त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र ।
जेथ जगाचें जीवनसूत्र । श्रीमहालया असे ॥ १८०४ ॥
तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु ।
न्यायातें पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु ॥ १८०५ ॥
तेथ महेशान्वयसंभूतें । श्रीनिवृत्तिनाथसुतें ।
केलें ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें ॥ १८०६ ॥
एवं भारताच्या गांवीं । भीष्मनाम प्रसिद्ध पर्वीं ।
श्रीकृष्णार्जुनीं बरवी । गोठी जे केली ॥ १८०७ ॥
जें उपनिषदांचें सार । सर्व शास्त्रांचें माहेर ।
परमहंसीं सरोवर । सेविजे जें ॥ १८०८ ॥
तियें गीतेचा कलशु । संपूर्ण हा अष्टादशु ।
म्हणे निवृत्तिदासु । ज्ञानदेवो ॥ १८०९ ॥
पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती ।
सर्वसुखीं सर्वभूतीं । संपूर्ण होईजे ॥ १८१० ॥
शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें ।
सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥ १८११ ॥
इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां अष्टादशोध्यायः ॥

श्रीशके पंधराशें साहोत्तरीं । तारणनामसंवत्सरीं ।
एकाजनार्दनें अत्यादरीं । गीता\-ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ॥ १ ॥
ग्रंथ पूर्वींच अतिशुद्ध । परी पाठांतरीं शुद्ध अबद्ध ।
तो शोधूनियां एवंविध । प्रतिशुद्ध सिद्धज्ञानेश्वरी ॥ २ ॥
नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका । जयाची गीतेची वाचितां टीका ।
ज्ञान होय लोकां । अतिभाविकां ग्रंथार्थियां ॥ ३ ॥
बहुकाळपर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी ।
प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाठी संपूर्ण जाली ॥ ४ ॥
ज्ञानेश्वरीपाठीं । जो ओंवी करील मऱ्हाटी ।
तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली ॥ ५ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु ॥
॥ श्री परमात्मने नमः ॥
॥ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥