Wednesday, December 18, 2013

Panduranga karu pratham Naman - Sant Tukaram (Lyrics ) / पांडुरंगा करू प्रथम नमन -संत तुकाराम

पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरण संतांचिया॥१॥
यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु । बाबाजी सद्गुरुदास तुका ॥२॥
काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवू चित्तासी आपुलिया ॥३॥
या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥
सीण जाला मज संवसार संभ्रमे । सीतळ या नामे जाली काया॥५॥
या सुखा उपमा नाही द्यावयासी । आले आकारासी निर्विकार ॥६॥
नित्य धावे तेथे नामाचा गजर । घोष जयजयकार आइकता ॥७॥
तातडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥
मूळ नरकाचे राज्य मदे माते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥
दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसे गोचिडासी क्षीर राहे ॥१०॥
हे वाट गोमटी वैकुंठासी जाता । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥
जाणते तयांनी सांगितले करा । अंतरासी वारा आडूनिया ॥१२॥
यासी आहे ठावे परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥
नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥
चित्त ज्याचे पुत्र पत्‍नी बंधूवरी । सुटल हा परि कैसे जाणा ॥१५॥
जाणते नेणते करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥
माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥
कोणी तरी काही केले आचरण । मज या कीर्तनेविण नाही ॥१८॥
नाही भय भक्ता तराया पोटाचे । देवासी तयाचे करणे लागे ॥१९॥
लागे पाठोवाटी पाहे पायां कडे । पीतांबर खडे वाट झाडी ॥२०॥
डिंकोनिया का रे राहिले हे लोक । हे चि कवतुक वाटे मज ॥२१॥
जयाने तारिले पाषाण सागरी । तो ध्या रे अंतरी स्वामी माझा॥२२॥
माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥
हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचे ॥२४॥
चेतवला अग्नि तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥
मना धीर करी दृढ चित्ता धरी । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥
बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरी होय दासी कामारी त्या ॥२७॥
त्याचा भार माथा चालवी आपुला। जिही त्या दिधला सर्व भाव ॥२८॥
भावेविण जाणा नाही त्याची प्राप्ति । पुराणे बोलती ऐसी मात ॥२९॥
मात त्याची जया आवडे जीवासी। तया गर्भवासी नाही येणे ॥३०॥
यावे गर्भवासी तरी च विष्णुदासी । उध्दार लोकासी पूज्य होती ॥३१॥
होती आवडत जीवाचे ताइत। त्या घडी अच्युत न विसंभे ॥३२॥
भेदाभेद नाही चिंता दुःख काही । वैकुंठ त्या ठायी सदा वसे ॥३३॥
वसे तेथे देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥
संपदा तयांची न सरे कल्पांती। मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥
लाभ तया जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥
लागलेसे पिसे काय मूढजनां । काय नारायणा विसरली ॥३७॥
विसरली तया थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौऱ्यासी ॥३८॥
शिकविले तरी नाही कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥
गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥४०॥
तळमळ त्याची काही तरी करा । का रे निदसुरा बुडावया ॥४१॥
या जनासी भय यमाचे नाही । सांडियेली तिही एकराज्ये ॥४२॥
जेणे अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥
तान भूक जिही साहिले आघात । तया पाय हात काय नाही ॥४४॥
नाही ऐसा तिही केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥
याच जन्मे घडे देवाचे भजन । आणीक हे ज्ञान नाही कोठे ॥४६॥
कोठे पुढे नाही घ्यावया विसावा । फिरोनि या गावा आल्याविण॥४७॥
विनविता दिवस बहुत लागती । म्हणउनि चित्ती देव धरा ॥४८॥
धरा पाय तुम्ही संतांचे जीवासी । वियोग तयासी देवा नाही ॥४९॥
नाही चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया॥५०॥
त्याचीच उच्छिष्ट बोलतो उत्तरे । सांगितले खरे व्यासादिकी ॥५१॥
व्यासे सांगितले भक्ति हे चि सार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥
तरावया जना केले भागवत । गोवळ गोपी भक्त माता पिता ॥५३॥
तारुनिया खरे नेली एक्यासरे । निमित्ते उत्तरे ऋषीचिया ॥५४॥
यासी वर्म ठावे भक्ता तरावया । जननी बाळ माया राखे तान्हे ॥५५॥
तान्हेले भुकेले म्हणे वेळोवेळा । न मगता लळा जाणोनिया ॥५६॥
जाणोनिया वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवे धावे ॥५७॥
धावे सर्वथा धेनु जैसी वत्सा । भक्तालागी तैसा नारायण ॥५८॥
नारायण व्होवा हाव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाही ॥५९॥
पार नाही सुखा ते दिले तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥
रामनाम दोनी उत्तम अक्षरे । भवानी शंकरे उपदेशिली ॥६१॥
उपदेश करी विश्वनाथ कानी । वाराणसी प्राणी मध्ये मरे ॥६२॥
मरणाचे अंती राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावे तया ॥६३॥
तयासी उत्तम ठाव वैकुंठी । वसे नाम चित्ती सर्वकाळ ॥६४॥
सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरी । नसे क्षणभरी स्थिर कोठे ॥६५॥
कोठे नका पाहो करा हरिकथा । तेथे अवचिता सापडेल ॥६६॥
सापडे हा देव भाविकांचे हाती। शाहाणे मरती तरी नाही ॥६७॥
नाही भले भक्ती केलियावाचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥
नागवलो म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकला तो ॥६९॥
तो चि देव येर नव्हे ऐसे काही । जनार्दन ठायी चहू खाणी ॥७०॥
खाणी भरूनिया राहिलासे आत । बोलावया मात ठाव नाही ॥७१॥
ठाव नाही रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥
वाणी बोलूनिया गेली एक पुढे । तयासी वाकुडे जाता ठके ॥७३॥
ठका नाही अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥
दास ठेला पोट अर्थ दंभासाटी । म्हणउनि तुटी देवासवे ॥७५॥
सवे देव द्विजा तीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥
पाड करूनिया नागविली फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥
वादका निंदका देवाचे दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकर्मी ॥७८॥
षडकर्मी हीन रामनाम कंठी । तयासवे भेटी सवे देवा ॥७९॥
देवासी आवडे भाविक जो भोळा । शुध्द त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥
मानियेला नाही विश्वास या बोला । नाम घेता मला युक्ति थोडी ॥८१॥
युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥
बोलता पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढे त्याच्या ॥८३॥
पुढे पार त्याचा न कळे चि जाता । पाउले देखता ब्रम्हादिका ॥८४॥
काय भक्तीपिसे लागले देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥
होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥
या बापासी बाळ बोले लाडे कोडे । करुनि वाकुडे मुख तैसे ॥८७॥
तैसे याचकाचे समाधान दाता । होय हा राखता सत्त्वकाळी ॥८८॥
सत्त्वकाळी कामा न येती आयुधे । बळ हा संबंध सैन्यलोक॥८९॥
सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥
कोपा मरण नाही शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्त्वगुणी ॥९१॥
सत्त्व रज तम आपण नासती । करिता हे भक्ति विठोबाची ॥९२॥
चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथे उणे काय निजसुखा ॥९३॥
सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥९४॥
एक चित्त धरू विठोबाचे पायी । तेथे उणे काही एक आम्हा ॥९५॥
आम्हासी विश्वास याचिया नामाचा । म्हणउनि वाचा घोष करू ॥९६॥
करू हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुध्दी दुष्ट नासे ॥९७॥
नासे संवसार लोक मोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥
सिकविले मज मूढा संतजनी । दृढ या वचनी राहिलोसे ॥९९॥
राहिलोसे दृढ विठोबाचे पायी । तुका म्हणे काही न लगे आता ॥१००॥

-संत तुकाराम 

Aamhi to Vaikunthache wasi aalo yachi karnasi - Sant Tukaram ( Lyrics ) / आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी - -संत तुकाराम

आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी ।
बोलिले जे ॠषी । साच भावे वर्तावया ।।

झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू  ।।धृ।।

अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने ।
 विषयलोभी मन । साधने बुडविली ।।

झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ।।धृ।।

पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
 तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ।।

झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ।।धृ।।

-संत तुकाराम 

bolava vitthal pahava vitthal - Sant Tukaram / बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल -संत तुकाराम ( lyrics )

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ।।

येणें सोसें मन जालें हांवभरे ।
परती माघारें घेत नाहीं ।।

बंधनापासुनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाश ।।

तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ।।

-संत तुकाराम 

lahanpan dega deva - Sant Tukaram / लहानपण दे गा देवा - -संत तुकाराम ( lyrics )

लहानपण दे गा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ।।

ऐरावत रत्न थोर ।
त्यासी अंकुशाचा मार ।।

जया अंगी मोठेपण ।
तया यातना कठीण ।।

तुका म्हणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान ।।

महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती ।।

-संत तुकाराम 

vrukshavalli amha soyare - Sant Tukaram / वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं -संत तुकाराम ( lyrics )

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ।।

आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ।।

कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ।।

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ।।

तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ।।

-संत तुकाराम 

hechi daan dega deva - Sant Tukaram / हें चि दान देगा देवा -संत तुकाराम ( lyrics )

हें चि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ।।

गुण गाईन आवडी ।
हे चि माझी सर्व जोडी ।।

नलगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ।।

तुका म्हणे गर्भवासी ।
सुखें घालावें आम्हांसी ।।

-संत तुकाराम 

khel mandiyala walwanti ghai - Sant Tukaram /खेळ मांडीयेला वाळवंटी घाई -संत तुकाराम ( lyrics )

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ।।

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा
हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ।।

वर्णअभिमान विसरली याती
एकएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।
पाषाणा पाझर सुटती रे ।।

होतो जयजयकार गर्जत अंबर
मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ।।

-संत तुकाराम 

Aamhi jato aapulya gawa - Sant Tukaram /आम्ही जातो आपुल्या गावा - संत तुकाराम ( lyrics )

आम्ही जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम  घ्यावा ।।

तुमची आमची हे चि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ।।

आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ।।

येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ।।

रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ।।

संत तुकाराम 

Anandache dohi Sant tukaram आनंदाचे डोही संत तुकाराम ( lyrics )

आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥

काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥

संत तुकाराम 

Tuesday, December 17, 2013

Oos ( us ) donga pari ras nahi donga उस डोंगा परी रस नाही डोंगा Sant chokhamela संत चोखामेळा

उस डोंगा  परी  रस  नाही  डोंगा  ।
काय भुललासी  वरलिया  रंगा ||
नदी  डोंगी  परी  तीर  नोहे  डोंगा  ।
काय  भुललासी  वरलिया  रंगा ||
चोखा डोंगा  परी  भाव  नोहे  डोंगा  ।
काय  भुललासी  वरलिया  रंगा ||

Nako devaraya aant aata pahu नको देवराया अंत आता पाहू Sant Kanhopatra संत कान्होपात्रा

नको देवराया, अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे

हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसे देवा

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई

मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात

Sundar te dhyan / सुंदर ते ध्यान Sant Tukaram


सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी
कर कटावरी ठेवोनिया

तुळसी हार गळा, कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रुप

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने

Wednesday, December 11, 2013

Hanuman Chalisa ( हनुमान चालीसा )

श्रीगुरु चरन सरोज रज निज मन मुकुर सुधारि।
बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि॥

बुद्धिहीन तनु जानिकै सुमिरौं पवनकुमार।
बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार॥

जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥ १ ॥

राम दूत अतुलित बल धामा।
अंजनि पुत्र पवनसुत नामा॥ २ ॥

महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी॥ ३ ॥

कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा॥ ४ ॥

हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
काँधे मूँज जनेऊ साजै॥ ५ ॥

शंकर सुवन केसरी नंदन।
तेज प्रताप महा जग बंदन॥ ६ ॥

बिद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर॥ ७ ॥

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया॥ ८ ॥

सूक्ष्म रूप धरी सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा॥ ९ ॥

भीम रूप धरि असुर सँहारे।
रामचन्द्र के काज सँवारे॥ १० ॥

लाय सँजीवनि लखन जियाए।
श्रीरघुबीर हरषि उर लाए॥ ११ 

रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई॥ १२ ॥

सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं॥ १३ ॥

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा॥ १४ ॥

जम कुबेर दिक्पाल जहाँ ते।
कबी कोबिद कहि सकैं कहाँ ते॥ १५ ॥

तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राजपद दीन्हा॥ १६ ॥

तुम्हरो मन्त्र बिभीषन माना।
लंकेश्वर भए सब जग जाना॥ १७ ॥

जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू॥ १८ ॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लाँघि गये अचरज नाहीं॥ १९ ॥

दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥ २० ॥

राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे॥ २१ ॥

सब सुख लहै तुम्हारी शरना।
तुम रक्षक काहू को डर ना॥ २२ ॥

आपन तेज सम्हारो आपै।
तीनौं लोक हाँक ते काँपे॥ २३ ॥

भूत पिशाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै॥ २४ ॥

नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा॥ २५ ॥

संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै॥ २६ ॥

सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा॥ २७ ॥

और मनोरथ जो कोई लावै।
तासु अमित जीवन फल पावै॥ २८ ॥

चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा॥ २९ ॥

साधु संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे॥ ३० ॥

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन्ह जानकी माता॥ ३१ ॥

राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा॥ ३२ ॥

तुम्हरे भजन राम को पावै।
जनम जनम के दुख बिसरावै॥ ३३ ॥

अंत काल रघुबर पुर जाई।
जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥ ३४ ॥

और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्व सुख करई॥ ३५ ॥

संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥ ३६ ॥

जय जय जय हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं॥ ३७ ॥

जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई॥ ३८ ॥

जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा॥ ३९ ॥

तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय महँ डेरा॥ ४० ॥

पवनतनय संकट हरन मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप॥